सध्या सुरू असलेलं राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन वेगवेगळ्या कारणांमुळे गाजत आहे. विरोधकांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून राज्य सरकारला घेरायला सुरुवात केली आहे. विधानभवनासोबतच भवनाच्या बाहेर देखील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगताना दिसू लागला आहे. या पार्श्वभूमीवर वादाच्या इतरही अनेक मुद्द्यांपैकी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक. काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून हे पद रिक्तच आहे. या निवडणुकीवरून राज्यात चांगलंच राजकारण रंगताना दिसून येत असून त्यावरून सत्ताधाऱ्यांकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लक्ष्य करण्यात येत आहे. राज्यपालांकडून निवडणूक घेण्याची परवानगी अद्याप मिळाली नसल्याचं सरकारकडून सांगण्यात येत आहे.

विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या मुद्द्यावरून राज्यपालांवर निशाणा साधला आहे. “विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक याच अधिवेशनात पार पडावी यासाठी महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांची चर्चा झाली आहे. सरकारच्या वतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना तसे पुन्हा कळवण्यात येईल. परंतु राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राज्यपाल राहिले नसून ते ‘भाजप’पाल झाले आहेत. त्यांच्याकडून काय अपेक्षा करायच्या?” असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.

उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नाना पटोलेंचं भाजपावर टीकास्त्र; म्हणाले, “राज्यपालांनी आता तरी…!”

“राजभवनावरून अद्याप प्रतिसाद नाही”

विधिमंडळ आवारात प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, “विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनातच व्हावी यासाठी महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल महोदयांना भेटून त्यासंदर्भात कळवण्यातही आलेले आहे. परंतु अद्याप राजभवनवरून अध्यक्षपदाच्या निवडणूक कार्यक्रमासंदर्भात प्रतिसाद आलेला नाही. आघाडीतील तिन्ही पक्षांनी याविषयी चर्चा केली आहे, सर्व कायदेशीर बाबींचा अभ्यास करून राज्यपाल महोदयांना पुन्हा याबाबत संदेश दिला जाईल”, असं नाना पटोले म्हणाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोण आहे महाविकास आघाडीचा उमेदवार?

दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून नेमकी कुणाला उमेदवारी दिली जाईल? याविषयी उत्सुकता ताणली गेली आहे. यासंदर्भात बोलताना नाना पटोले यांनी उमेदवाराचं नाव निश्चित झालं आहे, असं सांगितलं. “आमचा उमेदवार निश्चित झालेला आहे,.एकदा का निवडणूक प्रक्रिया सुरु झाली की नावही जाहीर करू”, असं पटोले म्हणाले.