राहुल गांधी यांच्या उपस्थितीतच दोन गटांत खडाजंगी

प्रशांत देशमुख, वर्धा</strong>

भाजप सरकारच्या विरोधात लढण्यासाठी दुसऱ्या स्वातंत्र्यलढय़ाची घोषणा काँग्रेसने केली असतानाच काँग्रेस नेत्यांना आधी स्वपक्षातील गटबाजी किंवा वादावादी आवरण्याचे मोठे आव्हान पेलावे लागणार आहे. महात्मा गांधी जयंतीच्या मुहूर्तावर सेवाग्राम आणि वर्ध्यात काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शक्तिप्रदर्शनाच्या वेळीच काँग्रेसमधील दोन गटांत वाद उफाळून आला.

राष्ट्रीय कार्यकारिणीची सेवाग्रामला बैठक, पदयात्रा व जहीर सभा या सर्व कार्यक्रमांचे नियोजन प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केले होते. नियोजनाच्या वेळीही आमदार रणजित कांबळे- शेखर शेंडे यांच्यातील वाद उफाळत होता. पक्षाचा कार्यक्रम म्हणून एकतेचे दर्शन घडवण्याची बाब कुणाच्या गावीही नव्हती. शेवटी प्रदेशाध्यक्षांना वेगवेगळी जबाबदारी द्यावी लागली. सण विनातंटा साजरा व्हावा म्हणून बैठकीची जबाबदारी कांबळेंकडे तर पदयात्रा आमदार अमर काळे व शेखर शेंडे यांच्याकडे सोपविण्यात आली. कांबळेंकडे आयोजित नियोजन बैठकीस शेखर शेंडे अनुपस्थित असल्याने चव्हाण यांनी शेंडेंकडे विचारणा केली. विना आमंत्रण मी कसा येणार, सोबत घेऊन चालतच नाही, त्यास मी जबाबदारी कसा, असा सवाल शेडेंनी प्रदेशाध्यक्षांना केला.

बैठकीचा संबंध नसलेले शेंडे सेवाग्रामात फि रकलेच नाही. मात्र, पदयात्रेची जुळवाजुळव करीत असताना आमदार कांबळेंनी केलेला हस्तक्षेप वादाची ठिणगी पेटवून गेला. त्याला पाश्र्वभूमी होती. हेलिपॅडवर ज्येष्ठ नेत्यांच्या स्वागतासाठी स्थानिक नेत्यांना पास देण्याचे काम आमदार कांबळेंच्या घरी  झाले. त्यात शेंडेंचा पत्ता कापण्यात आला. उलट राजकारणाशी संबंध नसलेल्या शेंडेंच्या वडील बंधूंना प्रवेश मिळाला. पदयात्रेवेळी गांधी पुतळय़ाखालीच शेंडे- कांबळे वाद घडला. यावेळी उपस्थित वरिष्ठ पोलीस अधिकारीही हे पाहून अवाक झाले. आपले कार्यकर्ते घेऊन येणाऱ्या शेंडेंना सभेस विलंब होण्याचे कारण देत यात्रा मार्ग अर्ध्यावर आणण्याचा सल्ला मिळाला. त्यांच्या कार्यकर्त्यांना हुसकावून लावण्यात आले. शेवटी पक्षाध्यक्ष या गोंधळातच गाडीत बसून पुढे निघाले.

किमान गांधी जयंतीदिनी तरी हा वाद जाहीर व्हायला नको होता, असे पक्षातील सर्वच नेते म्हणत आहेत. मात्र हा वाद शमण्यापलीकडे गेल्याची स्थिती आहे. वसंत साठे-प्रभा राव, प्रमोद शेंडे- प्रभा राव, विलासराव देशमुख- प्रभा राव, दत्ता मेघे -रणजीत कांबळे अशी मोठी परंपरा काँग्रेसमधील या वादास आहे. एकमेकांचे वाभाडे काढण्याची एकही संधी कुणी सोडत नाही. ताईंमुळेच प्रमोद शेंडेचे मंत्रीपद हुकल्याची बोच शेंडे गटास आहे. पालिका निवडणुकीत संसदीय मंडळाच्या सभेत तर प्रदेशाध्यक्ष्यांच्या उपस्थितीत कांबळे- शेंडे परस्परांवर धावून गेले होते. माणिकराव ठाकरे यांनी मध्यस्थी केली नसती तर हा वाद आणखी वाढला असता, अशी माहिती त्यावेळी उपस्थित एका नेत्याने दिली.

जिल्हा काँग्रेसवर पूर्णपणे कांबळे गटाचा पगडा आहे. पक्षात केवळ आम्हीच पक्ष न सोडल्याचा दावा करणाऱ्या शेंडे गटास कांबळे गटाने पुरते बेजार केले आहे. प्रत्येक निवडणुकीत तो गट पराभूत होतो. तरीही पक्ष त्यांना सांभाळून घेतो, असे कांबळे गटाचे म्हणणे असते. आज जिल्हय़ात कांबळे व काळे हे दोन आमदार वगळता सर्व सत्तास्थाने भाजपने पटकावली आहे. भााजपची घोडदौड रोखण्याची भाषा पक्षाचे धुरिण करतात. मात्र, अशा लाथाळय़ांनी किमान वध्रेत तरी भाजपचा वारू रोखणे अशक्य ठरावे. आम्हाला काहीच करायची गरज नाही, काँग्रेसवालेच मतदारांना आमच्याकडे वळवतात, असा टोमणा भाजप नेते हाणतात.

प्रभा राव आणि प्रमोद शेंडे यांच्यात जिल्ह्याच्या राजकारणावरून नेहमीच वाद होत असे. हा वाद आता दुसऱ्या पिढीतही कायम आहे. प्रभाताईंचे भाचे रणजित कांबळे यांनी जिल्ह्यातील पक्षाची सूत्रे आपल्या हातात राहतील यावर भर दिला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत प्रभाताईंची कन्या आणि महिला प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा चारुलता टोकस या इच्छुक आहेत.

पदयात्रेची जबाबदारी सामूहिक होती. सुरुवातीला गर्दी अनावर होत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विनंतीवरून मी पदयात्रा पुढे सुरू करण्याचे प्रदेशाध्यक्षांच्या संमतीने ठरवले. शेंडेंना मी हेच समजावले. विनाकारण पोलिसांशी वाद घालण्यात अर्थ नव्हता. वाद वाढल्याने प्रदेशाध्यक्षांनी मला तो सोडवण्याची सूचना केली. हेलिपॅडवरील नावे मी नव्हे, तर प्रदेशाध्यक्षांनी निश्वित केली. शेंडेबंधूला त्यांच्याच सूचनेने सहभागी करण्यात आले. लोकप्रतिनिधी व विविध शाखांचे अध्यक्षच स्वागतास गेले.

– रणजीत कांबळे, आमदार, काँग्रेस

कार्यकर्त्यांना हटकल्याने मी संतापलो. माझ्यावर पदयात्रेची जबाबदारी प्रदेशाध्यक्षांनी सोपविली होती. ती पूर्णपणे यशस्वी होत असल्याचे पाहून काहींनी त्यात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. तो मी कसा खपवून घेणार? दादागिरीने पक्ष चालत नाही.

– शेखर शेंडे, काँग्रेस नेते

वाद झाल्याचे माझ्या कानावर आले नाही. पक्षात अनेक कामे असतात. वेगवेगळय़ा जबाबदाऱ्या दिल्या जातात. माझ्याकडे काहीच तक्रार आली नाही. म्हणून मी याबद्दल काही बोलण्याचा प्रश्नच नाही. चांगल्या कामाला गालबोट कशाला?

-अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष काँग्रेस