सोलापूर : काँग्रेस पक्षाची ताकद ही विचारात आहे. सर्वांना सोबत घेऊन जाणारी ही विचारधारा कधीही संपणार नाही. पक्ष अडचणीत असताना पक्षातून कोणी बाहेर पडला तरी पक्ष संपत नसतो, असे मत सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी व्यक्त केले.

अक्कलकोटमध्ये आयोजित काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून खासदार पाटील बोलत होते. पाटील यांनी सध्या काँग्रेसला पाठिंबा दिलेला आहे. माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यास खासदार प्रणिती शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

अक्कलकोट तालुक्यातील काँग्रेसचे नेते, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी अलीकडेच पक्षाचा राजीनामा देऊन शिवसेना (शिंदे) पक्षात प्रवेश केल्यानंतर काँग्रेसचे अस्तित्व दाखविण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. पक्षाचे नवनियुक्त तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील व शहराध्यक्ष विलास राठोड यांनी स्वागत केले. यावेळी पक्षाच्या अन्य पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.

सतेज पाटील यांनी हिंदुत्वाच्या नावावर राजकारण करून स्वतः सत्तेची पोळी भाजणारी मंडळींना शहरात, गावात पाणीपुरवठा होतो का ? गुन्हेगारी आणि बेकारी थांबली आहे का ?, कितीजणांना हक्काचा रोजगार मिळाला, असे प्रश्न विचारले पाहिजेत, असे मत मांडले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खासदार प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर गुडघे टेकवून स्वतःची अपरिपक्वता जगाच्या वेशीवर टांगल्याचा आरोप केला. यावेळी काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष ॲड. नंदकुमार पवार, तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील, माजी नगराध्यक्षा डॉ. सुवर्णा मलगोंडा, अशपाक बळोरगी आदींची भाषणे झाली.