सांगली : मविआमधून सांगलीची जागा काँग्रेसला मिळाली नाही याच्या निषेधार्थ शुक्रवारी झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत मिरज तालुका काँग्रेस समिती बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर फलकावरील जिल्हा काँग्रेस समितीच्या नावातील काँग्रेस हा शब्द पुसण्यात आला.

सांगलीच्या जागेबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी फेरविचार करावा अशी विनंती एकीकडे काँग्रेसचे जिल्हा नेते आमदार डॉ. विश्‍वजित कदम यांनी केली असताना काँग्रेस कार्यकर्ते मात्र आज आक्रमक झाल्याचे पाहण्यास मिळाले. जिल्हा समितीच्या कार्यालयात तालुकाध्यक्ष अण्णासाहेब कोरे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीत विशाल पाटील यांची अस्मिता राखण्यासाठी बंडखोरी करावी, ताकद असताना काँग्रेसला जाणीवपूर्वक डावलले जात असल्याचा आरोप करत काँग्रेस समितीच बरखास्त करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.

हेही वाचा…“सिध्देश्वरची चिमणी पाडल्याचा बदला घ्या, भाजपला धडा शिकवा”, धर्मराज काडादी यांची भूमिका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी प्रा.सिकंदर जमादार, सुभाष खोत, वसंतदादा कारखान्याचे उपाध्यक्ष सुनील आवटी, बाजार समितीचे संचालक बाबगोंडा पाटील आदींसह विविध गावातील कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीनंतर कार्यालयाच्या दर्शनी भागावर रंगविण्यात आलेल्या जिल्हा काँग्रेस समितीच्या फलकावरील काँग्रेस या शब्दावर दुसरा रंग लावून काँग्रेस शब्द हटविण्यात आला. दरम्यान, मिरज शहर काँग्रेस समितीची रविवारी बैठक बोलावण्यात आली असून याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे शहराध्यक्ष महापालिकेतील माजी विरोधी पक्ष नेते संजय मेंढे यांनी सांगितले.