जिल्हय़ात अकोले, पारनेर, नेवासे, कर्जत, जामखेड, शेवगाव येथे नगरपालिका स्थापन करण्यास जिल्हा परिषदेने संमती दिली आहे. याशिवाय ३० हजारांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या नगरपंचायत स्थापण्यासही संमती देण्याचा निर्णय घेण्यात आला.
याशिवाय ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसह सरसकट सर्वासाठीच आरोग्य तपासणी मोहीम राबवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही सभेत आज, गुरुवारी घेण्यात आला. त्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत ‘आरोग्य कार्ड’ही दिले जाणार आहेत. आरोग्य कार्डचे वितरण व आरोग्य तपासणी मोहीम प्रथम गरोदर मातांसाठी राबवली जाणार आहे.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्थायी समितीच्या सभेत हा निर्णय घेण्यात आला. सभापती कैलास वाकचौरे, बाबासाहेब तांबे, हर्षदा काकडे, शाहूराव घुटे, सदस्य बाळासाहेब हराळ, सुवर्णा निकम, मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल तसेच अधिकारी उपस्थित होते.
शेतकरी कधीच स्वत:ची आरोग्य तपासणी करवून घेत नाही. त्याला आरोग्य तपासणीचे महत्त्व कळावे, यासाठी ही मोहीम राबवली जाणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्ण कल्याण समितीच्या निधीतून प्रथम ३०० जणांना कुटुंबप्रमुखांच्या नावाने आरोग्य कार्ड दिले जाणार आहे. त्यावर कुटुंबातील सर्वच सदस्यांच्या आरोग्याची माहिती असेल. हे कार्ड प्रथम गरोदर मातांना दिले जाणार आहेत, नंतर जि.प. सेसमधून यासाठी तरतूद केली जाणार आहे. प्रथम हा उपक्रम सदस्य हराळ यांनी देऊळगाव आरोग्य केंद्रात राबवला. तेथे सुमारे ५५० शेतकऱ्यांच्या आरोग्य तपासणीत १५० जणांना मधुमेह आढळला. त्याची माहिती त्यांनी सभेत दिली.
शेवगाव-पाथर्डी व ५४ गावांची प्रादेशिक पाणी योजना जिल्हा परिषद चालवणार आहे, त्यासाठी प्रत्येक गावांना मीटरप्रमाणे पाणीपुरवठा होणार आहे. प्रत्येक गावांना मीटर बसवण्यासाठी ३३ लाख ५५ हजार रुपये खर्चास सभेत मान्यता देण्यात आली. पाणीपुरवठा होणारी गावे पाणीपट्टी भरण्यास टाळाटाळ करत असल्याने हा निर्णय घेण्यात आला. सभेत महिला व बालकल्याण विभागामार्फत ४५ लाखाचे तर विशेष घटक योजनेंतर्गत ४० लाखाचे असे एकूण ९५ लाखाचे पिको फॉल मशिन घेण्यास मान्यता देण्यात आली.