Maharashtra Constable Sacked: पोलीस खात्यात नोकरी मिळविण्यासाठी आरक्षित गटातील बोगस प्रमाणपत्र सादर केल्याबद्दल महाराष्ट्र पोलीस दलातील एका पोलीस शिपायावर कारवाई करण्यात आली असून त्यांना नोकरीवरून बडतर्फ करण्यात आले आहे. सरकारी प्रकल्पग्रस्त असल्याचे प्रमाणपत्र दाखवून या व्यक्तीने पोलीस दलात नोकरी मिळवली होती. नायगाव स्थानिक शस्त्रास्त्र विभागात काम करणाऱ्या शेख यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे, अशी बातमी द इंडियन एक्सप्रेसने दिली आहे.
स्थानिक शस्त्रास्त्र विभाग, नायगावचे पोलीस उपायुक्तांनी शेख यांना कामावरून काढले आहे. बोगस प्रमाणपत्र सादर करून पोलीस दलात भरती झाल्याबद्दल शेख यांच्यावर यापूर्वी ठाणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर त्यांना अटकही झाली होती.
ठाणे पोलीस आयुक्तालयाने २०२१ मध्ये ५२१ पोलीस पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली होती. यासाठी २०२२ मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. एकूण पदांपैकी २६ पदे सरकारी प्रकल्पग्रस्तांसाठी राखीव ठेवण्यात आले होते.
याच राखीव प्रवर्गातून भरती होण्यासाठी शेख यांनी बनावट प्रमाणपत्र सादर केले होते आणि त्यांनी नोकरी मिळवली. त्यानंतर पडताळणीदरम्यान शेख यांचे प्रकल्पग्रस्तांचे प्रमाणपत्र बोगस असल्याचे समोर आले. शेख यांच्याकडे असलेले प्रमाणपत्र बीड जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाने जारी केलेले नव्हते.
तसेच जिल्हा दंडाधिकारी कार्यालयातही याबद्दलची कोणतीही नोंद आढळली नव्हती. बीड जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांकडून तसा अहवाल मिळाल्यानंतर ठाणे पोलिसांनी शेख यांच्याविरोधात मागच्यावर्षी गुन्हा दाखल केला होता. बनावट कागदपत्रे सादर करून फसवणूक केल्याच्या आरोपाखाली हा गुन्हा दाखल झाला होता.
याच प्रकरणात पोलिसांनी २१ जानेवारी रोजी शेख यांना अटकही केली होती. मात्र त्याला नंतर जामीन मंजूर झाला. विभागीय चौकशीनंतर आता शेख यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.