सोलापूर : घेतलेले दोन हजार रुपये परत करण्यावरून झालेल्या वादातून एका बांधकाम साहित्य पुरवठादाराच्या अंगावर चारचाकी मोटार घालून त्याला चिरडले. यात त्याचा मृत्यू झाला. जेलरोड पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद झाली आहे. याबाबत सुशीला गोविंद जाधव (वय ५२, रा. रविवार पेठ, कुचन प्रशालेजवळ, सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे पती गोविंद किसन जाधव (वय ५८) यांचा खून झाला आहे. याप्रकरणी तिघा भावांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मृत गोविंद जाधव यांच्या मुलाने चुकून यातील एका आरोपीच्या यूपीआय क्रमांकावर दोन हजार रुपये पाठविले होते. ही बाब त्याने निदर्शनास आणून दिल्यानंतर रक्कम परत देण्यावरून वाद झाला. त्याचे पर्यवसान भांडणात होऊन त्यातूनच विजय जाधव यांच्या हत्येत झाले. विजय जाधव हे आपल्या घरासमोर बुलेट दुचाकी जवळ उभे होते. त्यावेळी चारचाकी मोटारीतून आलेल्या तिघा हल्लेखोरांनी त्यांच्या अंगावर थेट मोटार घातली. यात बुलेटखाली पडून जाधव हे गंभीर जखमी झाले. रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. पोलीस तिघाही हल्लेखोर बंधुंचा शोध घेत आहेत.