सातारा: साताऱ्यातील संततधार पावसाने भातशेतीची वाढ खुंटली आहे. भात शेती पिवळी पडल्याने उत्पादनावर परिणाम झाला आहे. स्ट्रॉबेरी रोपांवरही रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. स्ट्रॉबेरी रोपांवर विविध रोग तर भात शेतीची वाढ खुंटली असून, भात शेती पिवळी पडली आहे. याचा उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे.

भात शेतीचे आगार म्हणून ओळख असणाऱ्या साताऱ्यातील जावळी महाबळेश्वर तालुक्यात संततधार पावसाचा मोठा परिणाम झाला आहे. पश्चिम विभागातील केळघर परिसरात सलग चार महिन्यांपासून पडत असलेल्या पावसाने भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सूर्यप्रकाशाअभावी वाढ खुंटली असून, ज्यादा पावसाने भात शेती पिवळी पडली आहे.

स्ट्रॉबेरी रोपे करणाऱ्या शेतकऱ्यांच्या स्ट्रॉबेरीवरही विविध रोग पडू लागल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. पूर्वी या परिसरात भाताबरोबर भुईमूग, हायब्रीड ( संकरित ज्वारी ), नाचणी, वरी, तसेच वरकड जमिनीत उडीद, घेवडा, चवळी आदी पिके घेतली जात होती. परंतु, रानटी जनावरे व पक्षी यामुळे ती हाती लागत नसल्याने शेतकऱ्यांनी ही पिके बंद केली आहेत. यंदा पर्जन्यमान चांगले झाल्याने निदान भात पीक व स्ट्रॉबेरी तरी सावरेल, अशी आशा असताना पावसाने यावर पाणी फिरवल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.

संततधार पावसामुळे व सूर्यप्रकाश न मिळाल्याने भात पिकाची वाढ खुंटली असून, भात शेती पिवळी पडलेली आहे. स्ट्रॉबेरीची रोपे लागवडीचा सध्या हंगाम सुरू असून, पावसामुळे स्ट्रॉबेरीची रोपे काढता येत नाहीत आणि त्यावर काही रोगही पडले आहेत. कृषी व महसूल विभागाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.           

मे महिन्यापासून सतत पडणाऱ्या पावसामुळे भात शेतीचे नुकसान झाले असून, भात पीक हातातून जाण्याची शक्यता आहे. भात शेतीला जोड म्हणून काही शेतकरी कर्ज काढून स्ट्रॉबेरी रोप तयार करतात. वर्षभर गुजराण असलेल्या भात शेतीतून फायद्याऐवजी मोठे आर्थिक नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागणार आहे. – रघुनाथ पार्टे, शेतकरी,केळघर ता. जावळी