सांगली : जलजीवन मिशन अंतर्गत करण्यात आलेल्या नळपाणी योजनेचे कंत्राटदार हर्षल पाटील (वय ३५, रा. तांदूळवाडी, ता. वाळवा) यांनी शेतात गळफास घेऊन मंगळवारी आत्महत्या केली. शासनाकडे सुमारे दीड कोटीचे देयक थकीत असल्याने निर्माण झालेल्या आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याचा दावा राज्य कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष मिलिंद जाधव यांनी केला आहे. याबाबत कुरळप पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक निरीक्षक विक्रम पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, कर्जबाजारीपणातून पाटील यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे सांगितले.
संघटनेचे अध्यक्ष जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत राज्यात शासनाने ‘हर घर जल’ ही योजना सुरू केली. कंत्राटदारांनी पूर्ण केलेल्या कामांचे, तसेच केलेल्या कामांचे देयक देण्यासाठी शासनाकडे जवळपास १ वर्षापासून निधीच उपलब्ध नाही.
मृत पाटील यांचे शासनाकडे जवळपास १.४० कोटींची देयके प्रलंबित होती. तसेच सावकार व इतर आर्थिक लोकांकडून त्याने जवळपास ६५ लाखांचे कर्ज घेतले होते. त्यामुळे आर्थिक विवंचना व देणेकऱ्यांचा तगादा यातून तरुण अभियंत्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. दरम्यान, याबाबत कुरळप पोलीस ठाण्याचे प्रभारी श्री. पाटील यांनी सांगितले, की आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस ठाण्यात याबाबत आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.