नागपूर: काँग्रेस हा अहिंसा व शांतीच्या मार्गावर चालणारा पक्ष आहे, असा दावा काँग्रेस नेत्यांकडून सातत्याने केला जातो. मात्र राज्यातील सत्ता गेल्यावर या पक्षातील विदर्भाच्या काही नेत्यांचा संयम ढळला की काय असे त्यांच्या तोंडी आलेल्या शिवराळ भाषेवरून लोकांना वाटू लागले आहेत. अमरावती जिल्ह्यातील काँग्रेस नेत्या व माजी मंत्री यशोमती ठाकूर व नागपूरचे काँग्रेस नेते व विधान परिषदेचे सदस्य ॲड. अभिजित वंजारी हे दोन नेते त्यांच्या शिवराळ भाषेमुळे वादात सापडले आहेत.

यशोमती ठाकूर या सुसंस्कृत नेत्या म्हणून परिचित आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये महिला व बालविकास खात्याच्या मंत्री म्हणून त्यांनी काम केले. त्यावेळीही त्यांची काही विधाने गाजली होती. आता मागच्या आठवड्यात यशोमती ठाकूर यांच्या हस्ते तिवसा मतदारसंघातील एका रस्त्याचे भूमिपजून झाले. हे काम दर्जेदार व्हावे म्हणून त्यांनी अधिकाऱ्यांना चक्क डोके फोडण्याचीच धमकी दिली.‘ मी तुमच्याकडून एक पैसाही घेत नाही, रस्त्याचे काम दर्जेदार झाले नाही तर डोके फोडेल’, असे त्या म्हणाल्या. या घटनेची चित्रफीत ‘व्हायरल’ झाल्याने यशोमती ठाकूर चांगल्याच अडचणीत आल्या.

हेही वाचा- “शिवसेनेचं नाव व चिन्ह गोठवून हिंदुत्ववादी मतं एका पेटीत आणण्याचा भाजपाचा डाव” पृथ्वीराज चव्हाणांचं मोठं विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसरी घटना नागपूरमधली आहे. काँग्रेसचे विधान परिषद सदस्य ॲड. अभिजित वंजारी यांनी आमदार निधीतील कामाच्या मुद्यावरून महापालिका अधिकाऱ्यांची दूरध्वनीवरून कानउघाडणी केली. या संभाषणाची ध्वनीफीत समाजमाध्यमावर ‘व्हायरल’ झाली आहे. यात आमदार वंजारींच्या तोंडी असलेली भाषा शिवराळ स्वरूपाची आहे. विशेष म्हणजे वंजारी हे पदवीधर मतदारसंघाचे म्हणजे सुशिक्षित मतदारांचे प्रतिनिधित्व करतात. त्यांच्याकडून अशा अशोभनीय भाषेचा वापर अनेकांना खटकणारा ठरला आहे. ध्वनीफितीतील आवाज आपला नाही, असे स्पष्टीकरण आमदार वंजारी यांनी दिले आहे. मात्र, या मुद्यावरून भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी त्यांच्या विरोधात महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली आहे. एकूणच राज्यातील सत्तांतरानंतर काँग्रेस नेत्यांचे संतुलन ढळू लागले, अशी टीका राजकीय वर्तुळातून होत आहे.