नांदेड: महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतरच्या ५० वर्षांत नांदेड जिल्ह्यामध्ये सहकार क्षेत्रातून ७ साखर कारखाने उभे राहिले. आज ६६व्या वर्षात ‘सहकारा’त केवळ एक कारखाना प्रचंड तोट्यात, कसाबसा सुरू आहे. ४ सहकारी साखर कारखान्यांवर खाजगी-मालकशाहीचे झेंडे फडकत आहेत. मागील काही वर्षांत याच जिल्ह्यात एका नव्या खाजगी कारखान्याची भर पडली. सहकार क्षेत्रातील दोन कारखाने कर्जबाजारीपणामुळे बंद अवस्थेत आहेत. मराठवाड्याची कोरडी-भाजकी भूमी ज्यांनी वेगवेगळ्या सिंचन प्रकल्पांच्या जाळ्यांतून ‘भिजकी’ केली ते शंकरराव चव्हाण आणि सहकारातील अफाट कामांमुळे पद्म पुरस्काराचे मराठवाड्यातील पहिले मानकरी श्यामराव कदम यांच्या कर्मभूमीतील सहकारी साखर कारखानदारीतले हे विदारक चित्र राज्यभर पसरले आहे. खुद्द कदम जिल्ह्यातील ज्या पहिल्या-कलंबर कारखान्याचे पहिले अध्यक्ष होते, तो कारखानाही मागील अनेक वर्षांपासून बंद होता. जिल्हा सहकारी बँकेेने तो गतवर्षी एका खाजगी संस्थेला विकला.

राज्य स्थापनेनंतरच्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने गेल्या मंगळवारी मुंबईमध्ये आयोजित केलेल्या एका परिसंवादात राज्याचे ज्येष्ठ नेते खा.शरद पवार यांनी सहकार चळवळीसह या क्षेत्रातील साखर कारखानदारीच्या आजच्या एकंदर परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली होती. सहकारी साखर कारखाने बुडवणार्‍यांनीच आपले कारखाने खाजगीरित्या विकत घेतल्याचे पवारांनी नमूद केले होते. नांदेड जिल्ह्यात नायगाव तालुक्यातील ‘जय अंबिका’ कारखान्याच्या बाबतीत पवार म्हणतात, तसे घडले आहे. राज्य स्थापनेनंतरच्या पहिल्या दोन दशकांत नांदेड जिल्ह्यात सहकार क्षेत्रातून ‘कलंबर’ आणि ‘गोदावरी मनार’ हे दोन कारखाने उभे राहिले. नंतरच्या २५ वर्षांत ‘शंकर’, ‘भाऊराव चव्हाण’, ‘जय अंबिका’, ‘हुतात्मा जयवंतराव पाटील’ आणि ‘जयशिवशंकर’ हे सहकारी साखर कारखाने वेगवेगळ्या भागांत सुरू झाले. पण आज शंकर, जय अंबिका, हुजपा आणि जय शिवशंकर हे चार कारखाने खाजगी क्षेत्रात गेले असून पहिल्या पर्वातील दोन्ही सहकारी साखर कारखाने बंद आहेत. त्यातील कलंबरच्या मालमत्तेची विक्री करून जिल्हा बँकेने आपले कर्ज वसूल केले.

जिल्ह्यातील प्रभावशाली राजकीय कुटुंबांशी संबंधित ‘भाऊराव चव्हाण’ हा एकमेव साखर कारखाना सहकार तत्त्वावर सुरू असला, तरी या संस्थेमध्ये ‘सहकार’ केवळ कागदोपत्री असल्याचे दिसते. या कारखान्याचे अध्यक्षपद आता वरील राजकीय कुटुंबातच गेले आहे. सुमारे १५ वर्षांपूर्वी भाऊराव चव्हाणने जिल्ह्यातील दोन सहकारी साखर कारखाने राज्य बँकेच्या लिलाव प्रक्रियेतून विकत घेतले होते. नंतर काही वर्षे हे कारखाने चालवल्यानंतर व्यवस्थापनाने हे दोन्ही प्रकल्प खाजगी संस्थांना विक्री केले. खा.शरद पवार यांनी मुंबईतील कार्यक्रमात सहकारात घुसलेल्या खाजगीकरणाबद्दल चिंता व्यक्त केल्यानंतर मराठवाड्यातील साखर उद्योग प्रकल्पांची माहिती घेतली असता, विभागातील आठ जिल्ह्यांमध्ये एकंदर ५१ साखर कारखाने असून त्यांतील निम्म्याहून जास्त म्हणजे २८ साखर कारखाने खाजगी क्षेत्रात असून २३ कारखाने सहकारी क्षेत्रात सुरू असल्याचे २०२४-२५च्या गाळप हंगामाच्या अहवालातून दिसून आले. राज्य बँकेचे मुख्य प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात एकेकाळी सहकारी साखर कारखान्यांची संख्या २०९ होती. ती आता १०३ पर्यंत खाली आली आहे. सरलेल्या हंगामात १०४ खाजगी कारखान्यांमध्ये उसाचे गाळप झाले.

सोलापूर विभाग खाजगीत अव्वल !

साखर आयुक्तालयाने राज्यातील साखर उद्योगाची आठ विभागांमध्ये विभागणी केली आहे. त्यात कोल्हापूर हा सर्वात मोठा विभाग असून या विभागात सहकार व खाजगी कारखान्यांची संख्या २६ ः १४ अशी आहे. सोलापूर विभागात २८ खाजगी तर १७ सहकारी साखर कारखाने आहेत. नांदेड विभागात १९ खाजगी आणि १० सहकारी साखर कारखाने आहेत. विदर्भातील दोन विभागात ७ पैकी ६ कारखाने खाजगी क्षेत्रात आहेत. राज्यातील सहकारी साखर कारखानदारीचा पाया ज्या अहिल्यानगर जिल्ह्यात घातला गेला त्या जिल्ह्यातही खाजगी कारखानदारी (संख्या-१२) फोफावली आहे. या विभागात १४ सहकारी साखर कारखाने आहेत. कोल्हापूर आणि पुणे हे दोन विभाग सहकारी साखर कारखानदारीच्या बाबतीत (संख्या-२६ व १८) अव्वल स्थान राखून आहेत.