पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात करोना बाधित रुग्णांची संख्या 20 च्या जवळपास असली तरीदेखील राज्यातील वाढलेली रुग्णांची संख्या पाहता जिल्ह्याने नव्याने समर्पित करोना रूग्णालय उभारण्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलली आहेत. जिल्ह्यात या आठवडा अखेरीस करोना बाधित 230 गंभीर रुग्णाना तर लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असणाऱ्या एक हजार करोना बाधितांना उपचार करण्याची सुविधा कार्यरत करण्याचा प्रयत्न आहे. तसेच परिस्थीनीनुसार आवश्यकता भासल्यास जिल्ह्यात या दोन्ही प्रकारच्या १५०० रुग्णांवर उपचार करण्याची सुविधा करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. त्याचपद्धतीने संसर्गाच्या तपासणीसाठी डहाणू येथे प्रयोगशाळेला मान्यता मिळण्यासाठी आयसीएमआर कडे अर्ज करण्यात आला आहे.
राज्यामध्ये करोना बाधित रुग्णांपैकी सुमारे 80 टक्के रुग्णाला या आजाराची लक्षणे दिसून येत नसल्याचे आढळले असून त्यांना समर्पित कोविड आरोग्य केंद्र (डेडिकेटेड कोविड हेअल्थ सेंटर- डीसीएचसी) मध्ये उपचार केले जातात. अशा सौम्य प्रकारे बाधित झालेल्या रुग्णांच्या उपचारासाठी पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात तसेच डहाणू येथील ट्रॉमा केअर सेंटर मध्ये प्रत्येकी वीस खाटांची सध्या व्यवस्था आहे. यामध्ये येत्या आठवड्यात वाडा येथील आयडियल हॉस्पिटलमध्ये 100 खाटांची अतिरिक्त व्यवस्था करण्यात येणार असून आगामी काळात तलासरी येथील दयानंद रुग्णालय व गरज भासल्यास डहाणू तालुक्यातील वेदांत रुग्णालय अडीचशे खाटांची व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात इतर ठिकाणी अशाच पद्धतीने व्यवथा करण्याचे काम हाती घेण्यात आली असून ८००- १००० रुग्णाची व्यस्था करण्यासाठी आरोग्य विभागाची तयारी सुरु आहे.
करोना बाधित गंभीर असणाऱ्या 30 रुग्णांसाठी समर्पित कोविड रुगालयात (डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल- डीसीएच ) मध्ये दाखल करण्यात येते. सध्या बोईसर येथील टिमा रुग्णालयात या प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे. विक्रमगड तालुक्यातील रिवेरा रुग्णालयात अशा 200 गंभीर रुग्णांची व्यवस्था करण्याच्या दृष्टीने तयारी अंतिम टप्प्यात असून येत्या आठवडाभरात पूर्ण होईल असा विश्वास आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे. त्याचबरोबरीने जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर झाल्यास व अशा रुग्णांच्या उपचारासाठी अतिरिक्त व्यवस्था गरजेची भासल्यास डहाणू तालुक्यातील वेदांत हॉस्पिटल व पालघर येथील डॉ. एम एल ढवळे ग्रामीण होमिओपॅथी रुग्णालयात एकूण साडेतीनशे खाटांची व्यवस्था करण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे.
याखेरीज जिल्ह्यात 18 ठिकाणी फिवर क्लिनीक तसेच कोविड केअर सेंटरची उभारणी करण्यात आली असून याठिकाणी संशयित रुग्णांना दाखल करण्याची व त्यांच्यावर देखरेख ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याप्रमाणे सर्दी, खोकला आणि ताप असलेल्या रुग्णांना या ठिकाणी उपचार करण्यात येणार आहे. या व्यवस्थेमध्ये रवेरा रुग्णालय हॉस्टेल परिसरात 100 रुग्णाची देखभाल करण्याची व्यवस्था उभारण्यात येणार असल्याची माहिती पालघर जिल्ह्यातील आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
सद्यस्थितीत पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात करोना बाधित एकवीस रुग्ण असून त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला होता तर इतर तीन रुग्ण करोना वर मात करून घरी परतले आहेत. राज्यभरातील करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने होणारी वाढ पाहता जिल्ह्याने वैद्यकीय व्यवस्था व रुग्णांकरिता सुविधा केंद्र वाढविण्याच्या दृष्टीने ठोस पावले जिल्हाधिकारी डॉ. कैलाश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हाती घेतले असून त्यादृष्टीने संपूर्ण आरोग्य यंत्रणा कार्यरत झाली आहे. या करोना समर्पित रुग्णालयांच्या व संबंधित केंद्रांच्या उभारणीसाठी जिल्ह्याने आवश्यक निधी मंजूर केला असून याकरिता राज्य शासन व सेवाभावी संस्थांकडून मदत घेतली जात आहे.
दरम्यान जिल्ह्यातील करोना संशयितांचे घशाचे व थुंकीचे नमुने तपासणी साठी मुंबई येथील शासकीय व्यवस्थेकडे पाठविण्यात येत असून त्याचे निकाल उपलब्ध होण्यास तीन ते पाच दिवसांचा अवधी लागत आहे. संशयितांची तपासणी अहवाल लवकर प्राप्त व्हावते आणि जिल्ह्यात अधिकाधिक प्रमाणात तपासणी करता यावी या दृष्टीने डहाणू येथील उप जिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळेला परवानगी मिळण्यासाठी आयसीएमआर कडे अर्ज करण्यात आले आहे. ही मान्यता मिळाल्यांनतर जिल्ह्यातील रुग्णाचे अहवाल लवकर प्राप्त होणे अपेक्षित आहे.