मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार लॉकडाउनच्या काळात राज्यातील जनतेशी संवाद साधून धीर देत आहेत. त्याचबरोबर करोनामुळे ओढवणाऱ्या संकटाची जाणीव करून देत संयम बाळगण्याचं आवाहनही करत आहेत. आज पवार यांनी जनतेशी संवाद साधताना वेगवेगळ्या मुद्यांवर भाष्य केलं. त्याचबरोबर लॉकडाउनला मुदतवाढ देण्याच्या शक्यताविषयीही संकेत दिले.
फेसबुक लाईव्हवरून संवाद साधताना शरद पवार यांनी राजधानी दिल्लीतील निझामुद्दीन येथील मरकझमध्ये झालेल्या कार्यक्रमाविषयी नाराजी व्यक्त केली. “मकरझचा कार्यक्रम टाळायला हवा होता. त्यामुळे देशात परिणाम होतील. महाराष्ट्रात तरी असं काही होऊ देऊ नका. मुस्लिम नागरिकांनी घरातच नमाज अदा करावी,” असं पवार म्हणाले.
“देशात ९० टक्के लोक लॉकडाउनला प्रतिसाद देत आहे. १० टक्के लोक अद्यापही नियम पायदळी तुडवत आहेत. त्यामुळे करोनाला आवर घालण्याचा प्रयत्न सुरू असताना संयम पाळण्याची गरज आहे. दोन आठवडे धीर धरायला हवा. १४ एप्रिलला आंबेडकर जयंती आहे. दरवर्षी आपण दोन महिने हा जयंती सोहळा साजरा केला जातो. पण, यंदा तशी स्थिती नाही. त्यामुळे जयंती सोहळा पुढे ढकलावा,” असं आवाहन पवार यांनी केली.
आणखी वाचा- ‘जनता सुधारणार नाही सैनिकांना बोलवा’, या मागणीवर शरद पवारांनी दिलं हे उत्तर
“राज्य सरकारनं रोगांवर आवर घालण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. आरोग्य यंत्रणांना लोकांनी सहकार्य करावं. त्याचबरोबर पोलीस दल धोका पत्करून काम करत आहे. पण, काही लोक लॉकडाउन पाळत नाही. त्याची किंमत सगळ्यांना द्यावी लागते. लॉकडाउन न पाळणाऱ्यांविरोधात पोलिसांना भूमिका घ्यावी लागत आहे. सध्या दोन आठवड्याचा लॉकडाउन करण्यात आला आहे. मात्र, लोकांनी काळजी घेतली नाही आणि करोनाचा संसर्ग वाढत गेला. तर लॉकडाउनचा कालावधी वाढवण्याची भूमिका केंद्र आणि राज्य सरकारला घ्यावीच लागेल. त्यामुळे कृपा करून ही वेळ येऊ नये म्हणून आपण नियमांचं काटेकोरपणानं पालन करा,” असं पवार म्हणाले.