करोना विरोधातील लढाईत प्रत्येक टप्प्यावर महाराष्ट्राने आज आघाडी घेतली असून देशातील सर्वाधिक चाचण्या आज महाराष्ट्रात केल्या जातात. राज्यात सध्या रोज २ लाख ८८ हजार चाचण्या होत असून येत्या काही दिवसात तीन लाखांचा टप्पा महाराष्ट्र ओलांडले असे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. राज्याच्या पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेश असून तेथे रोज २,४०,००० चाचण्या केल्या जातात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोना रुग्णांवरील उपचार व साधनसामग्री यावरून केंद्रातील नेते व राज्यातील नेत्यांमध्ये राजकीय लढाई सुरु असली तरी वेळोवेळी आरोग्य विभागाने घेतलेल्या निर्णयांची दखल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या राज्यात येणाऱ्या पथकांनी घेतली आहे. करोनाच्या पहिल्या लाटेत रुग्ण संपर्कातील लोक शोधण्यातही महाराष्ट्र देशात आघाडीवर होता. आता दुसऱ्या लाटेतही रुग्णांसाठी खाटांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आली तसेच ऑक्सिजन खाटा, अतिदक्षता विभागातील खाटा आणि व्हेंटिलेटरची व्यवस्था यात महाराष्ट्र देशात अव्वल आहे. राज्यात एकीकडे चाचण्यांची संख्या वेगाने वाढवली जात होती तर दुसरीकडे रुग्णवाढीचा वेग प्रचंड राहिला यातून रेमडेसिवीर व ऑक्सिजनची चणचण यावरून लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. तथापि कितीही टिका झाली तरी कोणत्याही परिस्थितीत रुग्ण संख्या वा आरोग्य विषयक माहितीत कोणतीही लपवाछपवी करायची नाही, अशी सुस्पष्ट भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रुग्णहित लक्षात घेऊन ठेवली. त्याच्या परिणामी राज्यातील रुग्णसंख्या स्थिरावरून कमी होताना दिसते तर मुंबईतील करोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे.

चाचण्यांचा वेग वाढवूनही रुग्णसंख्या कमी होण्यामागे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास यांचे रुग्णोपचारासाठी केलेले नियोजन तसेच सरकारने घेतलेला टाळेबंदीचा निर्णय कारणीभूत असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर डॉ प्रदीप व्यास यांनी करेना चाचण्यांचा वेग अधिक वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातही आरटीपीसीआर चाचण्या जास्तीतजास्त व्हावा हा त्यांचा आग्रह असून आजच्या दिवशी महाराष्ट्रात १,७०,२४५ आरटीपीसीआर चाचण्या व १,१८,०३६ अशा मिळून २,८८,२८१ चाचण्या केल्या जात आहेत.

महाराष्ट्र हे देशात करोना चाचणीत आज सर्वप्रथम असून त्यापाठोपाठ उत्तर प्रदेशचा दुसरा क्रमांक लागतो. युपीमध्ये सध्या दररोज २ लाख ४० हजार चाचण्या केल्या जात असून कर्नाटकमध्ये एक लाख ८० हजार, गुजरातमध्ये एक लाख ७० हजार, केरळ एक लाख ३० हजार, तामिळनाडू एक लाख ३० हजार, दिल्ली ७६ हजार व पश्चिम बंगाल ५५ हजार करोना चाचण्या रोज केल्या जातात.

मार्च अखेरीस केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशातील सर्व राज्यांना करोना चाचण्या वाढविण्यास सांगितले होते. त्यातही आरटीपीसीआर चाचण्या जास्त करण्यास सांगितले होते. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी केंद्राच्या भूमिकेची दखल घेऊन १ एप्रिल रोजी चाचण्या वाढविण्यासंदर्भात राज्य आरोग्य हमी सोसायटीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ सुधाकर शिंदे यांची समिती नेमली. या समितीने सादर केलेल्या अहवालात शासकीय व खाजगी प्रयोगशाळांची क्षमता वाढविण्यासाठी वेगवेगळ्या शिफारशी केल्या. डॉ व्यास यांनी त्याची तात्काळ अंमलबजावणी केल्यामुळे राज्यातील चाचण्या १,३०,००० वरून आज २,८८,२८१ एवढ्या वाढल्या आहेत. या चाचण्या तीन लाखांपेक्षा जास्त करण्यासाठी आता तीन मोबाईल व्हॅन प्रयोगशाळा घेण्यात आल्या असून याद्वारे नागपूर, पुणे व औरंगाबाद येथे रोज २७ हजार करोना चाचण्या केल्या जाणार आहेत. तसेच टाटा टेक्नॉलॉजी मोबाईल प्रयोगशाळेच्या माध्यमातून रोज सहा हजार चाचण्या केल्या जाणार असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus maharashtra first in corona test in the country msr
First published on: 26-04-2021 at 21:30 IST