करोना विषाणूचा संसर्गामुळे राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या ४९ वर पोहचली आहे. याचा सर्वाधिक फटका पुणे, पिंपरी-चिंचवडला बसला आहे. या भागात सर्वाधिक करोनाग्रस्त अढळून आले आहेत. याच पार्भ्वभूमीवर पुणे शहरामध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र अशा परिस्थितही सरकारी यंत्रणा आणि पोलीस आपले कर्तव्य पार पडताना दिसत आहे. जमावबंदीमध्ये तैनात असणाऱ्या याच पोलिसांची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी चौकशी केली. तसेच ऑन ड्यूटी पोलिसांच्या जेवणाची गैरसोय होणार नाही यासंदर्भातील निर्देशही टोपे यांनी दिले आहेत.

करोना विषाणू संसर्ग प्रतिबंधाबाबत तयारीचा आढावा घेण्यासाठी टोपे यांनी बुधवारी पुण्याला भेट दिली. या भेटीनंतर पुण्यातून निघताना त्यांनी जमावबंदीच्या काळात तैनात असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची विचारपूस केली. यासंदर्भातील एक व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेसच्या ट्विटवर हॅण्डलवरुन पोस्ट करण्यात आला आहे. “कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत दिवसभर डोळ्यांत तेल घालून ड्युटी निभावणाऱ्या पोलिसांची गैरसोय तर होत नाही ना, त्यांच्या जेवणाची व्यवस्था होतेय की नाही याबद्दल सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आस्थेने विचारपूस केली. रात्री उशिरा पोलिसांच्या जेवणाची गैरसोय होऊ नये म्हणून सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था केली. कोरोनाशी लढण्यासाठी अथक प्रयत्न करत असलेले आरोग्यमंत्र्यांनी आपल्यातील माणुसकीचे दर्शन यातून घडवले,” असं राष्ट्रवादीने केलेल्या ट्विटमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

 

राष्ट्रावादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही ट्विटवरुन करोना विषाणूंचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांचे कौतुक  केलं आहे. तसचं त्यांनी ट्विट करत या संकटाचा समान करणाऱ्या सरकारी यंत्रणेचे कौतुक करतानाच याची लढाई आपण नक्कीच जिंकू असा विश्वास व्यक्त केला आहे. “कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी झटणारे डॉक्टर्स, नर्स, रुग्णालयांचा इतर स्टाफ यांचे कौतुक. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि आरोग्य मंत्रालय ही परिस्थिती अतिशय उत्तमरित्या हाताळत आहेत. त्यांचा अभिमान वाटतो, याशिवाय पोलीस, सरकारी अधिकारी, एअरपोर्ट व सार्वजनिक स्थळी कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचेही मनापासून आभार. आपण सर्वजण आमचे खरे हिरो आहात.आपण एकत्रिपणे या संकटाचा सामना करु आणि हि लढाई नक्की जिंकू,” असा विश्वास सुळे यांनी ट्विटवरुन व्यक्त केला आहे.