चीनमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जगभरामध्ये पुन्हा एकदा करोना हा चर्चेचा विषय ठरत आहे. चीनमधील परिस्थिती आणि करोना रुग्णांची संख्या चिंतेत भर घालत आहे. चीनसह अन्य देशांत पुन्हा करोनाचा उद्रेक झाल्याने भारताची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापर, लसीकरण पूर्ण करण्याबरोबरच अन्य उपाययोजना करण्याचा सल्ला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी राज्यांना दिला. महाराष्ट्रामध्येही पुन्हा मास्क अनिवार्य होणार का यासंदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी बुधवारी पत्रकारपरिषदेत महत्त्वाचं विधान केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्रीय आरोग्यमंत्री काय म्हणाले?

चीनमध्ये करोनाच्या नव्या उत्परिवर्तनामुळे मोठी रुग्णवाढ नोंदविण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी बुधवारी तज्ज्ञांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. ‘‘करोनासाथ अद्याप संपलेली नाही. त्यामुळे रुग्णसंख्या कमी असली तरी करोना प्रतिबंधक उपाययोजनांवर भर द्यायला हवा. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापर करण्याबरोबरच वर्धक मात्रेसह संपूर्ण लसीकरणासाठी प्रयत्नशील राहावे’’, असे मंडाविया यांनी सांगितले.

तानाजी सावंतांनी घेतली आढावा बैठक

चीनबरोबरच जगभारतील देशांमध्ये वाढणारा करोनाचा प्रादुर्भाव आणि केंद्र सरकारने सतर्क राहण्यासंदर्भात दिलेल्या सूचनाच्या पार्श्वभूमीवर तानाजी सावंत यांनी नागपूरमधून करोना परिस्थितीचा आढावा घेणारी बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “चीनमध्ये किंवा भारताबाहेर जे चित्र दिसत आहे, प्रसारमाध्यमांनी वार्तांकन केलं आहे ते पाहून केंद्र सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे. राज्यांनाही सांगितलं आहे की तुम्ही याबद्दल सतर्क राहा,” असं तानाजी सावंत म्हणाले.

नक्की वाचा >> चीनमध्ये थैमान घालणाऱ्या BF7 Variant चे रुग्ण महाराष्ट्रात सापडले? आरोग्यमंत्री तानाजी सावंत म्हणाले, “आमच्याकडे कुठल्याही…”

घाबरण्याची गरज नाही

त्याचप्रमाणे आरोग्यमंत्र्यांनी लसीकरणाचा संदर्भ देत चीनमधील करोना प्रादुर्भावाने आपण घाबरुन जाण्याची गरज नसल्याचं म्हटलं. “या वेळेस घाबरुन जाण्याचं काहीच कारण नाही. कारण कोव्हीडचा डोस एक, डोस दोन आणि ६०-६५ वर्षांवरील लोकांना बुस्टर डोस आपण दिलेला आहे. त्यामुळे घाबरुन जाण्याचं अजिबातच कारण नाही. आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चरच्या सुविधा, आरोग्य सुवधा आणि करोनासंदर्भातील टीम सर्वजण तयारीमध्ये आहेत. त्याचाच एक आढावा घेणारी बैठक घेतली आहे. दोन दिवसांमध्ये आमच्याशी कम्युनिकेट करा आम्ही सुविधा पुरवू असं सर्वांना आम्ही कळवलं आहे,” असं सावंत म्हणाले.

तयारी पूर्ण

“माझ्या डिपार्टमेंटला अगदी रुट लेव्हलपासून म्हणजे पीएचसीपासून (प्रायमरी हेल्थ सेंटर) आपल्या तालुक्याच्या जागा असतील किंवा जिल्हास्तरावर असेल. मेगा सिटी असतील, मोठी शहरं असतील, महानगरपालिकेतील विभाग असतील सर्वांना हीच गोष्ट पुन्हा सांगितली की टेस्टींग, ट्रॅकींग, ट्रीटमेंट आणि व्हॅक्सिनेशन या चार स्टेप आहेत करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी. ९५ टक्क्यांहून अधिक जणांचे दोन्ही डोस पूर्ण झालेले आहेत. इम्युनिटी पॉवर वाढलेली आहे. महाराष्ट्रातील लोकांना आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की अशापद्धतीच्या काही बातम्या आल्या तर घाबरुन जाण्याचं अजिबात कारण नाही. प्रशासन, शासन सतर्क आहे निर्णय घेण्यासाठी आपली यंत्रणा पूर्ण तयारीत आहे,” असं सावंत म्हणाले.

नक्की पाहा >> Photos: ओसाड शहरे, औषधांसाठी स्पर्धा, प्लास्टिकमध्ये गुंडाळेली बाळं, PPE किटमध्ये रिक्षावाले अन्… चीनमध्ये करोनामुळे हाहाकार

मास्कसक्ती लागू होणार?

करोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न म्हणजे पुन्हा मास्क अनिवार्य होणार का? हाच प्रश्न पत्रकार परिषद संपताना आरोग्यमंत्र्यांना विचारण्यात आला. मास्क कम्पल्सरी करणार का? असा प्रश्न पत्रकाराने तानाजी सावंतांना विचारला. यावर तानाजी सावंतांनी, “हे आम्ही उद्या ठरवू,” असं सांगितलं. बुधवारच्या पत्रकारपरिषदेत दिलेल्या या उत्तरावरुन आरोग्यमंत्र्यांनी आजच्या आढावा बैठकीमध्ये मास्क अनिवार्य करण्यासंदर्भातील चर्चा होणार असल्याचे संकेत दिले आहेत. आजच्या बैठकीनंतर आरोग्यमंत्री पुन्हा पत्रकारांशी संवाद साधून सरकारच्या निर्णयांची माहिती देतील असं समजतं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus outbreak in china tanaji sawant maharashtra health minister talk about mask compulsory in state scsg
First published on: 22-12-2022 at 10:53 IST