राज्यातील त्यातही खास करुन मुंबईतील करोनाग्रस्त रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. मंगळवारी (२८ एप्रिल रोजी) मुंबईतील करोनाग्रस्तांची संख्या सहा हजाराच्या जवळ पोहोचली आहे. मंगळवारी मुंबईत आणखी ३९३ नवे रुग्ण आढळले आल्याने शहरातील एकूण आकडा ५९८२ वर गेला आहे. एकीकडे राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडावा वाढत असतानाचा दुसरीकडे राजभवन आणि मंत्रालयातील संघर्ष वाढतानाचा दिसत आहे. यावरुनच युवासेनेच्या एका नेत्याने माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे.
करोनाच्या संकटात राज्याला स्थर्याची गरज असल्याने घटनात्मक पेच टाळण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर नियुक्ती करण्याची शिफारस महाविकास आघाडीने केली आहे. यासंदर्भात महाविकास आघाडीतील मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. दरम्यान, त्याआधी मंगळवारी दुपारच्या सुमारास फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन असून राज्य सरकारला जाब विचारण्याची मागणी केली. राज्यात अघोषित आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण करुन पत्रकार-संपादकांमध्ये दहशत निर्माण केली जात असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला आहे. माध्यमांची मुस्कटदाबी आणि अभिव्यक्तीची गळचेपी थांबवा अशी मागणी यावेळी त्यांनी केली. भाजपा नेते विनोद तावडे, प्रवीण दरेकर, आशीष शेलार, मंगलप्रभात लोढादेखील यावेळी उपस्थित होते. याच भेटीच्या पार्श्वभूमीवर युवासेनेचे नेते आणि सचिव वरुण सरदेसाई यांनी एक ट्विट केलं आहे. “बरं ते जॅकेट कायमचं उतरलं आहे की हा ‘लॉकडाउन लूक’ आहे ?”, असं ट्विट सरदेसाई यांनी केलं आहे.
बरं ते जॅकेट permanently उतरले आहे की हा ‘Lockdown Look’ आहे ?
— Varun Sardesai (@SardesaiVarun) April 28, 2020
फडणवीस हे त्यांच्या पेहरावासाठी ओळखले जातात. त्यातही जॅकेट हा फडणवीस यांच्या पेहरावाचा महत्वाचा भाग असतो. अगदी मुख्यमंत्री असल्यापासून विरोधीपक्ष नेते पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतरही फडवणवीस हे जॅकेट घातलेल्या पेहरावात दिसून यायचे. मात्र मागील काही दिवसांपासून फडणवीस यांच्या अनेक फोटोमध्ये ते जॅकेट न घालताच दिसत आहेत. अनेक फेसबुक लाइव्ह आणि संवादांदरम्यान फडणवीस यांचा हा लूक पहायला मिळाला आहे. यावरुनच आता सरदेसाई यांनी हा टोला लगावला आहे.
