पंढरपूर : येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील चौफाळा ते महाद्वार घाट या दरम्यान कॉरिडॉर प्रस्तावित आहे. यामधील सुमारे ६३० मालमत्ताधारकांचे सामाजिक- आर्थिक निकषाबाबत सर्वेक्षण सुरू झाले आहे. येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालातील विद्यार्थी आणि पालिकेतील अधिकारी यांच्यामार्फत या सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. यासाठी १२ पथकांद्वारे या सर्वेक्षणाचे काम पुढील चार दिवसांत होणार असून, मालमत्ताधारकांनी सर्वेक्षणासाठी येणाऱ्या पथकास योग्य माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. काही बाधितांनी याला विरोध केला आहे.

येथे श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने येत आहेत. यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. भविष्यातील गरज लक्षात घेता श्री विठ्ठल मंदिर परिसरात कॉरिडॉर करण्याचा शासनाचा प्रस्ताव आहे. या संदर्भात १ व २ मे रोजी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी येथील स्थानिक नागरिक, व्यापारी, विक्रेते यांच्याशी प्राथमिक चर्चा करून समस्या जाणून घेतल्या होत्या. तसेच, प्रशासन काय करणार याची सर्व माहिती वरील सर्वांना दिली. त्या अनुषंगाने प्राथमिक सर्वेक्षणास गुरुवारपासून १२ पथकांद्वारे सुरुवात झाली. या पथकात केबीपीचे महाविद्यालयीन विद्यार्थी, पंढरपूर नगरपालिकेचे अधिकारी-कर्मचारी यांचा समावेश आहे. हे सर्वेक्षण प्राथमिक असून, ६३० मालमत्ताधारकांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

या बाधितांना द्यावयाचा मोबदला हा जास्तीचा मिळावा, यासाठी त्या बाधित कुटुंबाची सामाजिक, आर्थिक माहिती घेतली जाणार आहे. यामध्ये जागेची माहिती, जागेचा वापर, व्यावसायिक असेल, तर अंदाजे उत्पन्न आदी माहिती संकलित केली जाणार आहे. विकास आराखड्याची व्याप्ती लक्षात घेऊन संबंधितांना विश्वासात घेऊन द्यावयाची भरपाई व पुनर्वसन याबाबत प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने बाधितांना जास्तीत जास्त मोबदला देता येईल, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. तरी बाधितांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

कॉरिडॉर रद्दची मागणी

मंदिर परिसरातील काही बाधितांनी नुकत्याच झालेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत विरोध केला होता. केवळ यात्रेतील गर्दी बघून आमची घरे पाडू नका. वस्तुस्थिती समजून घ्या. या आधी आमची घरे पाडली, त्याचा मोबदला मिळाला नाही. त्यामुळे काही बाधित मालमत्ताधारकांनी कॉरिडॉरला विरोध करण्याची भूमिका घेतली आहे.