सातारा : महाबळेश्वर शहरातील रहदारीस अडथळा ठरणारी अतिक्रमित टपरी मोठ्या पोलीस बंदोबस्तात फौजफाट्यासह पहाटे महाबळेश्वर पालिका प्रशासक योगेश पाटील, प्रभारी पोलीस निरीक्षक नितीन केणेकर, निवासी नायब तहसीलदार दीपक सोनावले यांच्या नेतृत्वामध्ये पोलीस व पालिका अधिकारी, कर्मचारी यांच्या माध्यमातून हटविण्यात आली.
महाबळेश्वर पालिका हद्दीमधील काही वर्षांपासून एक खाद्यपदार्थांचा हातगाडा होता. त्यानंतर त्याच ठिकाणी एक भलीमोठी टपरी उभारली गेली. त्या जागी जावेद वारुणकर व त्यांचे कुटुंबीय व्यवसाय करत होते. गेल्या वर्षभरापासून रहदारीस अडथळा ठरणारी ही टपरी काढण्यात यावी, अशी मागणी होत होती. ही टपरी अनधिकृत असल्याची माहिती पालिका प्रशासनास होती. वेळोवेळी जावेद वारूणकर यांना ही टपरी हटविण्याबाबत पालिकेच्या वतीने नोटिसी बजावण्यात आल्या.
मात्र त्यानंतर देखील ही टपरी संबंधितांनी हटवली नाही. अनेकदा हे अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न केला. मात्र टपरीधारकांच्या कुटुंबांनी घातलेल्या गोंधळामुळे हा प्रयत्न फोल गेला होता.यामुळे मुख्याधिकारी व प्रशासक योगेश पाटील यांनी पोलीस बंदोबस्तात पहाटे सहा वाजता ही टपरी हटवली. पालिका प्रशासन व पोलीस बंदोबस्त कमी झाल्यानंतर टपरीधारकाने पुन्हा या ठिकाणी हातगडा आणून ठेवला तोही प्रशासनाने हटवला.
यावेळी टपरी मालकासह त्याच्या नातेवाइकांनी घातलेल्या गोंधळामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना धमकी दिल्याप्रकरणी एकाच कुटुंबातील आठ जणांविरुद्ध पालिका स्थापत्य अभियंते मुरलीधर धायगुडे यांच्या तक्रारीवरून महाबळेश्वर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.