कराड : कृष्णा नदीवरील कराड शहरानजीक कार्वे पुलाखाली नदीपात्रात भल्या मोठ्या मगरीचे दर्शन झाल्याने खळबळ उडाली. ही मगर पाहण्यासाठी पुलावर वाहनधारकांची व परिसरातील लोकांची मोठी गर्दी होताना, काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली. याबाबतची माहिती अशी की, कराड शहरानजीक कृष्णा नदीवर असलेल्या कार्वे पुलाजवळ नदीपात्रात काहीजणांना भल्या मोठ्या मगरीचे दर्शन झाले.

काल बुधवारी सायंकाळी उशिरा काही लोकांना कृष्णा नदीपत्रात ही मगर दिसली. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह कराड-तासगाव रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांनी मगर पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यामुळे या मार्गावर काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती.

दरम्यान, नदीपत्रात मगरीचे दर्शन झाल्याने कार्वेसह परिसरातील गावांतील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच वन व वन्यजीव विभागाने तत्काळ या मगरीला पकडून सुरक्षित ठिकाणी सोडावे, अशी मागणी होत आहे. कृष्णा नदीपात्रात दर्शन झालेल्या मगरीने येथील डोहात अंडी घातली असल्याने ती या भोवती वावरत असावी असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. अधिवास पूर्वीपासूनखरेतर कृष्णा- कोयना नद्या या मगरींचे आश्रयस्थान पूर्वीपासूनच आहे. या दोन्ही नद्यांच्या डोहामध्ये स्वाभाविकपणे त्यांचे वास्तव्य आढळले आहे. कराड तालुक्यातील वारुंजी, कराडचा प्रीतीसंगम, टेंभू प्रकल्प, आटके, पाचवड, कोडोली, रेठरे बुद्रुक पुढे सांगली जिल्ह्यातील बाहे, बोरगाव आदी ठिकाणी मगरींचा वावर पूर्वीपासून आढळतो. हा त्यांचा अधिवासच असून, त्यास विरोध झाला तर, मगरींनी जायचे तरी कुठे असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. नदीची पर्यावरणस्थिती उत्तम राहण्यासाठी नद्यांच्या डोहात मगरी असणे गैर नाही. लोकांनी त्यांना बिथरू सोडू नये. गेल्या वर्षा- दीड वर्षापूर्वी कराड येथील प्रीतिसंगमावर पोहत असताना मधुकर थोरात यांच्यावर एका मगरीने अचानक हल्ला केला होता. त्यांचा पाय तोंडात पकडून डोहात खेचत असताना, थोरात यांनी जोराने दुसऱ्या पायाचा फटका देत मगरीच्या तोंडातील पाय सोडवून हिमतीने नदीकाठ गाठल्याने ते सुदैवाने बचावले होते. यानंतर प्रीतिसंगमावर पोहण्यास येणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. परंतु, मगरीच्या उपद्रवाची घटना पुन्हा घडलेली नाही. सांगली जिल्ह्यातून वाहणाऱ्या कृष्णा नदीचे पात्र आणि डोह मोठा असल्याने तिथे मगरींचे प्रमाण जास्त आढळते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, वन परिक्षेत्र अधिकारी ललिता पाटील ‘लोकसत्ता’शी बोलताना म्हणाल्या, की आम्ही जिथे मगर दिसली त्या ठिकाणी जावून आलो आहोत. त्या परिसरात सावधानतेचे फलक लावण्यात आले आहेत. मगर दिसल्यास तेथून बाजूला जाणे, स्वतःची काळजी घेणे गरजेचे असल्याचे पाटील म्हणाल्या.