अलिबाग: पितृपक्षात पंधरा दिवस श्राध्दविधी केले जातात. हा कालावधी पितरांबाबत आदर भावना व्यक्त करण्याचा असतो. त्यामुळे या काळात दान, धर्म, महालय श्राध्द तसेच तर्पण विधी केले जातात. या कालावधीत कावळ्यांना महत्व असते. कारण पितरांचा संदेशवाहक म्हणून कावळा ओळखला जातो. पण सध्या सुरू असलेल्या पितृपक्षात अनेक ठिकाणी कावळेच दिसेनासे झाल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.
जगभरात कावळ्यांच्या ३० ते ३५ प्रजाती आहेत. त्यापैकी सहा ते सात प्रजाती भारतात आढळतात. पुर्वी मोठ्या संख्येनी आढळणारे हे पक्षी हळुहळु दिसेनासे होऊ लागले आहेत. कावळ्यांची संख्येत लक्षणीय घट झाली असल्याचे पहायला मिळत आहे. पितृपक्षातील श्राध्द विधीत केल्या जाणाऱ्या अन्नदानात कावळ्याला विशेष स्थान असते, श्राध्य विधीत केलेले अन्नदान कावळ्याने ग्रहण केल्यास ते पितरांपर्यंत पोहोचल्याचे मानले जाते. त्यामुळे या कालावधीत कावळ्यांना मोठ्याप्रमाणात अन्नग्रहणासाठी आवाहन केले जात असते. मात्र कावळेच दिसेनासे झाल्याने, अन्नग्रहण होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हे अन्न गाईला देण्याची वेळ येत आहे.
वाढत्या शहरीकरणामुळे आधी चिमण्यांचे अस्तित्व धोक्यात आले. आता चिमण्यापाठोपाठ कावळ्यांचे अस्तित्वही धोक्यात आल्याचे चित्र सध्या रायगड जिल्ह्यातील अनेक भागात पहायला मिळत आहे. गेल्या काही वर्षात रायगड जिल्ह्यात शहरीकरणात झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे पशुपक्षांचे नैसर्गिक अधिवास कमी व्हायला सुरवात झाली आहे. त्यामुळे कावळ्यांची संख्या कमी होत असल्याचे पक्षी निरीक्षक सांगातात.
कचरा कुंड्यामधील शिळे अन्न, मृत प्राणी यांचे भक्षण करून कावळे वास्तव करत असत, मात्र नागरीकरणामुळे कचरा कुंड्या बंदिस्त झाल्या, उकीरडे नामशेष झाले त्यामुळे कावळ्यांच्या कुपोषणाला सुरवात झाली. त्यामुळे कावळ्यांची संख्या घटण्यास सुरवात झाली आहे. शहरीभागातून आधी चिमण्या आणि आता कावळे हद्दपार होण्यास सुरवात झाली असल्याचे निरिक्षक अलिबाग येथील पक्षी निरीक्षक प्रविण कवळे यांनी नोंदवले आहे.
कावळ्यांना घरटी करण्यासाठी उंच आणि घनदाट सावली देणारी वृक्ष हवी असतात, शहरांच्या विस्तारीकरणात अशी मोठी झाडे तोडली जातात. त्यामुळे घरटी बांधण्यासाठी कावळ्यांना जागाच उपलब्ध होत नाहीत, याचा परिणाम कालांतराने तेथील कावळ्यांच्या संख्येवर होत जातो. कावळ्यांची संख्या मागील अनेक कारणापैकी हे देखील एक कारण असल्याचे प्रविण कवळे यांनी सांगितले.
उंदीर मारण्यासाठी विषारी औषधांचा वापर केला जातो, नंतर मेलेले उंदीर उघड्यावर टाकले जातात, या मेलेल्या उंदरांच्या शरिरात विषारी द्रव्य तसेच राहतात, अशा उंदीरांचे मास खाल्ल्याने कावळ्यांचा मृत्यू होतो. त्यामुळे कावळ्यांची संख्या कमी होत आहे. – राजू मुंबईकर, पक्षीमित्र