अलिबाग- गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती झाली नाही आणि नादुरुस्त रस्त्यामुळे अपघात झाल्यास संबधित यंत्रणांवर जबाबदारी निश्चित करून सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल केले जातील असा इशारा रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिला. रस्ता सुरक्षा समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली या बैठकीत हा इशारा देण्यात आला. रस्ते अपघात टाळण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणानी सार्वजनिक बांधकाम विभाग,राष्ट्रीय महामार्ग तसेच परिवहन विभाग यांनी तातडीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात असे निर्देश त्यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी जावळे बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक आचल दलाल, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, अधीक्षक अभियंता सुषमा गायकवाड, पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांसह सर्व कार्यन्वयीन यंत्रणा उपस्थित होते.
बैठकीमध्ये रायगड ग्रामीण पोलीस तसेच नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गेल्या वर्षात झालेल्या अपघातांचा व त्या अनुषंगाने केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, एनएचएआय, एमएसआरडीसी, सार्वजनिक बांधकाम-राष्ट्रीय महामार्ग विभाग, पनवेल महानगरपालिका हद्दीतील धोकादायक अपघात ठिकाणांबाबतचा (ब्लॅकस्पॉट) आढावा घेऊन केलेल्या उपाययोजना व त्यानंतर अपघात प्रमाणात झालेली घट याबाबत चर्चा करण्यात आली.
जिल्ह्यातील रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्ह्यात महामार्ग, राज्य मार्ग यांवरील ब्लॅक स्पॉट शोधून त्यावर उपाययोजना, दर्शक सुचना फलक लावणे, वेग मर्यादा दर्शक फलक लावणे, महामार्गावर अनधिकृतरित्या डिव्हायडर तोडून ठेवले आहेत,ते पुन्हा स्थापीत करुन संबंधितांवर गुन्हे दाखल करणे आदी उपाययोजना राबवाव्या. जिल्ह्यातील रस्ते अपघाताचे प्रमाण शून्यावर आणणे, अपघातानंतर जखमींना तात्काळ उपचार सुविधा उपलब्ध करुन मृत्यूदर शून्यावर आणणे या उद्धिष्टांसह हे काम गांभीर्याने करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी जावळे यांनी दिले.
दरम्यान व्यवसायाला लाभ व्हावा यासाठी काही व्यावसायिक मुख्यमार्गिका आणि सेवारस्ता यामधील डिव्हायडर तोडत असल्याचे निदर्शनास आले आहे. सेवारस्त्यावरील वाहन अचानक थेट मुख्य मार्गिकेवर तसेच मार्गिकेवरील वाहन अचानक वळत असल्यामुळे अपघात होऊ शकतात. त्यामुळे या व्यावसायिकांच्या विरोधात कठोर कारवाईची शिफारस यावेळी करण्यात आली. तसेच वाहतुकीला अडथळे आणणाऱ्या होर्डिंगला तातडीने हटविण्याचे निर्देश देखील जिल्हाधिकारी जावळे यांनी दिले. आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करावेत असे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी यावेळी संबंधित यंत्रणाना दिले.