Former Chairman of Tata Sons Died in Car Accident in Mumbai: शापूरजी पालनजी या उद्योगघराण्याचे वारसदार सायरस मिस्त्री यांचे आज पालघर येथे भीषण अपघातात निधन झाले. पालघरमधील चारोटी येथे झालेल्या अपघातात सायरस मिस्त्री यांनी आपला जीव गमावला. अपघातानंतर जागीच त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती मिळत आहे. सायरस मिस्त्री हे शापूरजी पालोनजी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक होते. १९३० मध्ये सायरस यांचे आजोबा शापूरजी मिस्त्री यांनी सुरु केलेल्या कौटुंबिक व्यवसायाचे वटवृक्षात रूपांतर करण्यात सायरस यांचे मोलाचे योगदान होते.

सायरस मिस्त्री यांचा मुंबईत पारसी कुटुंबात जन्म झाला होता. उद्योगपती पल्लोनजी मिस्त्री यांचे ते सुपूत्र होते. लंडन बिझनेस स्कूलमध्ये शिक्षण घेतल्यावर त्यांनी लंडनच्या इंपीरियल कॉलेजमधून पदवी प्राप्त केली होती. २०१२ साली त्यांनी टाटा सन्सचे सहावे अध्यक्ष म्हणून रतन टाटा यांच्याकडून सूत्रे हाती घेतली होती. ऑक्टोबर २०१६ मध्ये झालेल्या वादानंतर टाटा सन्सच्या अध्यक्ष पदावरून मिस्त्री यांना हटवण्यात आले व पाठोपाठ फेब्रुवारी २०१७ मध्ये त्यांना टाटा सन्सच्या संचालक पदावरून तसेच समूहातील अन्य कंपन्यांवरून काढून टाकण्यात आले.

(Cyrus Mistry Death : सुप्रिया सुळे म्हणाल्या “माझा भाऊ गेला”, उद्योगपती हर्ष गोयंकांनीही व्यक्त केलं दु:ख, म्हणाले…)

टाटा समूहात भागीदारी करणाऱ्या एकमेव कुटुंबाचे वारस

सायरस मिस्त्री यांचे आजोबा शापूरजी मिस्त्री यांनी १९३० मध्ये कौटुंबिक व्यवसाय सुरू केला. यावेळी त्यांनी दोराबजी टाटा यांच्याकडून टाटा समूहातील भागभांडवल विकत घेतले होते. नंतर त्यांनी टाटा समूहातील १८. ५ टक्के हिस्सा खरेदी केला होता. मिस्त्री कुटुंब हे एकमेव कुटुंब आहे ज्यांनी टाटा समूहात भागीदारी केली होती.

याशिवाय मिस्त्री हे गेल्या १४२ वर्षांमध्ये समूहाचे प्रमुखपद भूषविणारे टाटा कुटुंबाच्या बाहेरील दुसरे व्यक्ती होते. केवळ चार वर्षे त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली होती.

टाटा विरुद्ध मिस्त्री

टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टीविरोधात मिस्त्री यांनी मार्च २०१७ मध्ये राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधिकरणाच्या मुंबई पीठाकडे दावा दाखल केला होता. जुलै २०१८ मध्ये न्यायाधिकरणाने त्यांचा हा दावा फेटाळून लावला आणि टाटा समूहातील कंपन्यांमध्ये रतन टाटा यांच्याकडून गैरव्यवस्थापन आणि दुराचार झाल्याचा त्यांनी याचिकेत केलेल्या आरोपातही तथ्य नसल्याचे स्पष्ट केलं होतं. त्यावर ऑगस्ट २०१८ मध्ये अपील न्यायाधिकरणाकडे मिस्त्री यांनी धाव घेतली होती.

न्यायमूर्ती एस. जे. मुखोपाध्याय यांच्या नेतृत्वाखालील दोन सदस्यीय अपील न्यायाधिकरणाने जुलैमध्ये दोन्ही पक्षांचे युक्तिवाद पूर्ण केले आणि १८ डिसेंबरला अंतिम निकाल दिला. रतन टाटा यांचे मिस्त्री यांच्याशी वर्तन अन्यायकारक होते, असंही न्यायाधिकरणाने निकालात नमूद केलं होतं. टाटा सन्सचे सार्वजनिक कंपनी ते खासगी मर्यादित कंपनीत रूपांतरणही बेकायदेशीर ठरविताना, तिला पुन्हा सार्वजनिक कंपनीचे मूळ रूप प्रदान केले जावे, असे अपील न्यायाधिकरणाने आदेशात म्हटलं होतं.

पालोनजी ग्रुपचा कापडापासून रिअल इस्टेट, हॉस्पिटॅलिटी आणि बिझनेस ऑटोमेशनपर्यंत पसरलेला व्यववसायाचा डोलारा सायरस मिस्त्री सांभाळत होते.