शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी मोठा बॉम्ब फोडला आहे. संजय राऊत यांनी शिवसेना मंत्री ( शिंदे गट ) दादा भुसे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. मंत्री दादा भुसे यांनी कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. याबाबत संजय राऊत यांनी ट्वीट केलं आहे. भाजपा आमदार राहुल कुल यांच्यानंतर दादा भुसे यांच्यावर संजय राऊतांनी केलेल्या आरोपांवरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

संजय राऊत ट्वीट करत म्हणाले, “हे आहेत मंत्री दादा भुसे. शेतकरी त्यांच्याविरोधात रस्त्यावर आले आहेत. गिरणा अ‍ॅग्रो नावाने १७८ कोटी २५ लाखांचे शेअर्स शेतकऱ्यांकडून गोळा केले. पण, कंपनीच्या वेबसाईटवर केवळ १ कोटी ६७ लाखांचे शेअर्स केवळ ४७ सभासदांच्या नावावर दाखवले. ही लूट आहे. लवकरच स्फोट होईल’, असा संजय राऊतांनी सांगितलं. ईडी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राऊत यांनी या ट्विटमध्ये टॅग केलं आहे.

हेही वाचा : “मी काय चुकलो? मी फक्त…”, ‘त्या’ मुलीचा फोटो ट्वीट केल्याप्रकरणी संजय राऊतांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “काहींच्या कोठ्यावर…!”

यावर आज ( २१ मार्च ) विधानसभेत बोलताना दादा भुसे यांनी स्पष्टीकरण देत संजय राऊतांवर हल्लाबोल केला आहे. “आम्हाला वारंवार गद्दार म्हणणारे आणि आमच्याच मतांवर राज्यसभेवर निवडून गेलेल्या संजय राऊतांनी काल एक ट्वीट केलं. जगाच्या पाठीवर असलेल्या कोणत्याही यंत्रणेच्या माध्यमातून या ट्वीटची चौकशी करण्यात यावी.”

“त्या चौकशीत मी दोषी आढळलो, तर आमदारकी आणि मंत्रीपदाचा राजीनामा देत राजकारणातून निवृत्त होईल. जर यात खोट आढळून आलं, तर या महागद्दारांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा द्यावा,” असं आव्हान दादा भुसे यांनी दिलं आहे.

हेही वाचा : “भारतात ५६ इंचांची छाती असणारे पंतप्रधान असताना…”; ब्रिटनमधील तिरंग्याच्या अपमानावरून ठाकरे गटाचं टीकास्र!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“हे भाकरी ‘मातोश्री’ची खातात आणि चाकरी राष्ट्रवादी आणि शरद पवारांची करतात. संजय राऊतांनी मालेगावच्या नागरिकांची आणि महाराष्ट्राची माफी मागावी. २६ मार्चपर्यंत माफी मागितली नाही, तर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचे शिवसैनिक त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा दादा भुसे यांनी दिला आहे.