लातूर- विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, पुरातन यज्ञभूमी रामेश्वर (रुई) ग्रामस्थ व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने राष्ट्रधर्म पूजक दादाराव कराड स्मृती प्रीत्यर्थ संत एकनाथ महाराज षष्ठीचे औचित्य साधून लातूर येथील रामेश्वर (रुई) येथे राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महा-वीर स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शुक्रवार,२१ मार्च २०२५ रोजी होणार आहे. स्पर्धेतील सर्वश्रेष्ठ विजेत्या मल्लास रोख रूपये १,२५,०००/-चांदीची गदा, पदक व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.

स्पर्धेचे उद्घाटन २१ मार्च रोजी स. ९ वा होईल. तसेच, पारितोषिक वितरण समारंभ त्याच दिवशी सायं. ७ वा. होईल. कार्यक्रमास राज्याचे युवक व क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे प्रमुख पाहुणे असतील. हिंद केसरी पै. जगदीश कालीरमण हे विशेष सन्माननीय पाहुणे असतील. तसेच हिंद केसरी पै. दिनानाथ सिंग, महाराष्ट्र केसरी पै. आप्पासाहेब कदम, महाराष्ट्र केसरी पै. रावसाहेब मगर हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

ही स्पर्धा माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. रामेश्वर (रुई)चे माजी सरपंच तुळशीराम दा. कराड हे प्रमुख मार्गदर्शक असतील.

 योग महर्षि शतायुषी वै. रामचंद्र गोपाळ शेलार उर्फ शेलारमामा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ तंदुरूस्त अशा पंच्चाहत्तर वर्षे वयाच्या पुढील मल्लांसाठी याच दिवशी एक आगळी वेगळी कुस्तीस्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. विजेत्यांना योग महर्षी वै. रामचंद्र गोपाळ शेलार उर्फ शेलारमामा स्मृती सुवर्ण, रोप्य, कांस्य गौरव पदक बहाल करण्यात येईल.

राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे हे १८वे वर्ष आहे. यासाठी महाराष्ट्रातील नामवंतांसह देशभरातील मल्लांना निमंत्रित केले आहे. राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेतील सर्वश्रेष्ठ विजेत्या मल्लास महाराष्ट्र कुस्ती महावीर हा अत्यंत बहुमानाचा किताब, रोख १,२५,०००/- चांदीची गदा व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. द्वितीय क्रमांकास रोख १,००,०००/-, तृतीय क्रमांक ५० हजार आणि चतुर्थ क्रमांकास २५ हजार रूपयां सह वजनगट ५७, ६१, ६५, ७०, ७४, ८६, ८६+ ते १२५ किलो वजन गटातील विजेत्या मल्लांना गटनिहाय हजारो रूपयांची पारितोषिके, सुवर्ण, रौप्य, कास्यं पदक, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच, उपांत्यपूर्व फेरीमध्ये पोहोचलेल्या सर्व कुस्तीगीरांना मानधन देण्यात येईल.

 सर्व कुस्तीगीरांनी आधारकार्डची मूळ प्रत व त्याची झेरॉस प्रत आणणे बंधनकारक आहे. स्पर्धा राज्य संघटनेच्या नियमानुसार घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणतीही प्रवेश फी आकारली जाणार नाही. स्पर्धेसाठी येणार्‍या निवडक कुस्तीगीरांच्या जाण्या येण्याचे एस.टी.भाडे, निवासाची व भोजनाची व्यवस्था संयोजकांतर्फे करण्यात येईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या स्पर्धेत जास्तीत जास्त मल्लांनी सहभागी व्हावे. त्याच बरोबर क्रीडाप्रेमींनी  उपस्थित रहावे. असे आवाहन स्पर्धेच्या संयोजन समितीने केले आहे. अशी माहिती माईर्स एमआयटी शिक्षणसंस्था  समूहाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य आमदार श्री. रमेश का. कराड, माईर्स एमआयटी शिक्षणसंस्था  समूहाचे कार्यकारी संचालक श्री. राजेश का. कराड, श्री. ऋषिकेश कराड  आणि एमआयटी डब्ल्यूपीयूच्या क्रीडा विभागाचे संचालक प्रा. विलास कुथुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.