scorecardresearch

जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने १, ४०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान

रावेर तालुक्यात नुकसानीचा आकडा सर्वाधिक

damage farms
(फोटो सौजन्य- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता प्रतिनिधी

जळगाव: शहरासह जिल्ह्यात रविवारी सायंकाळी मेघगर्जना करीत वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अवकाळीने शेतकर्‍यांना अवकळा आणली असून, अमळनेर तालुक्यातील नगाव खुर्द येथील १७ वर्षाच्या तरुणीचा वीज कोसळल्याने मृत्यू झाला. शहरासह जिल्ह्यात अवकाळी पावसाने सुमारे एक हजार चारशे हेक्टर क्षेत्रातील रब्बीच्या पिकांचे नुकसान झाले असून एकट्या रावेर तालुक्यात साडेचार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

रविवारी दिवसभर कडक ऊन होते; परंतु सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शहरासह मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस बरसला. पावसाने अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला होता. शेतांत चिखल झाला होता. सध्या परिपक्व झालेल्या आणि काढणी व कापणीला आलेल्या मका, हरभरा, गहू या पिकांचे नुकसान झाले असून, वादळी वार्‍यामुळे पिके आडवी झाल्याचे दिसून आले. शेतमजुरीसाठी कामाला गेलेल्या १७ वर्षाच्या तरुणीचा वीज कोसळून मृत्यू झाल्याची घटना अमळनेर तालुक्यातील नगाव खुर्द येथे रविवारी सायंकाळी घडली. याबाबत पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. निरगली पावरा असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. ती परराज्यातून नगाव खुर्द येथे शेतीकामासाठी कुटूंबासह आली होती.

हरासह जिल्ह्यात शनिवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसाने सुमारे एक हजार चारशे हेक्टर क्षेत्रातील रब्बीच्या पिकांचे नुकसान झाले आहे. अधिक नुकसान रावेर, चाळीसगाव, यावल तालुक्यात झाले आहे. अवकाळी पावसाने 64 गावांतील एक हजार 991 शेतकर्‍यांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागातर्फे वर्तविण्यात आला आहे.

आणखी वाचा- वादळी पावसामुळे जळगाव जिल्ह्यात ५६२ हेक्टर पीक नुकसान- कृषी विभागाचा प्राथमिक अहवाल

मार्चच्या सुरुवातीला होळी, धूलिवंदनाच्या दिवशी वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. आता पुन्हा १५ मार्चपासून वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. कमी-अधिक प्रमाणात होणार्‍या या अवकाळी पावसाने रब्बीतील पिकांसह केळीबागांचेही मोठे नुकसान झाले आहे. शनिवारी झालेल्या पावसाने केळीसह रब्बीतील गहू, केळी, मका, बाजरी, हरभरा, ज्वारी, तसेच भाजीपाला वर्गीय पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात १२९.७० हेक्टर क्षेत्रातील हरभरा, ३५ हेक्टर क्षेत्रातील बाजरी, ३२७ हेक्टर क्षेत्रातील गहू, ६८१ हेक्टर क्षेत्रातील मका, १८ हेक्टर क्षेत्रातील ज्वारी, ११० हेक्टर क्षेत्रातील भाजीपाला वर्गीय पिके, तर ६.१० हेक्टर क्षेत्रातील केळीबागांचे नुकसान झाले आहे. यावल तालुक्यात ५५.८२ हेक्टर, रावेर तालुक्यात ८२९.२५ हेक्टर, चाळीसगाव तालुक्यात ४५९ हेक्टर, तर पाचोरा तालुक्यातील ४.२० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे.

रावेर तालुक्यात शनिवारी रात्री वादळाने थैमान घातले. त्यामुळे केळीसह रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका या पिकांचे नुकसान झाले असून, सुमारे साडेचार कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाकडून वर्तविण्यात आला आहे. याबाबत तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी सांगितले की, रावेर तालुक्यातील ३६ गावांत एक हजार बारा शेतकर्‍यांच्या रब्बीतील परिपक्व झालेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात १४२ शेतकर्‍यांचा १२३ हेक्टर क्षेत्रातील हरभरा, साडेतीनशे शेतकर्‍यांचा २६२ हेक्टर क्षेत्रातील गहू, ५२० शेतकर्‍यांचा ४४४.२५ हेक्टर क्षेत्रातील मका या पिकांचे नुकसान झाले आहे. केळी नुकसानीबाबत प्रशासनाकडून माहिती प्राप्त झालेली नाही.

तालुक्यातील रावेरसह खिर्डी बुद्रुक व खुर्द, वाघाडी, शिंगाडी, रेंभोटा, खानापूर, चोरवड, भोर, होळ, ऐनपूर, निंबोल, वाघोड, कर्जोद, बोरखेडा, मोरगाव खुर्द, भोकरी, तामसवाडी, लालमाती, अभोडा बुद्रुक, जिन्सी, केर्‍हाळे, मंगरूळ, खिरवड, पातोंडी, पुनखेडे, थेरोळे, धुरखेडे, निंभोरासिम, बोर्‍हाडे, अंजनाड, नेहता, अटवाडे, दोधे, नांदूरखेडा, अजंदे या गावशिवारातील पिकांचे वादळाने नुकसान झाले आहे. महसूल विभागातील कर्मचार्‍यांसह तलाठी संपात सहभागी असून, नैसर्गिक आपत्ती पाहून ते नुकसानग्रस्त भागातील शेतकर्‍यांचे अश्रू पुसण्यासाठी सरसावले आहेत. त्यांनी नुकसानग्रस्त भागातील पिकांचे पंचनामे करीत असल्याची माहिती तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-03-2023 at 16:01 IST

संबंधित बातम्या