दापोली / अलिबाग / सातारा : राज्याच्या बहुतांश भागांत थंडी आणि ढगांचा लपंडाव सुरू असताना शहरांच्या गजबजाटापासून आणि रोजच्या धकाधकीपासून दूर जात नववर्षाचे स्वागत करण्यासाठी हजारो लोकांची पावले प्रसिद्ध पर्यटन स्थळांकडे वळली आहेत. महाबळेश्वर-पाचगणी, माथेरान, लोणावळा असो की अलिबाग, मुरूड, दापोली, मालवणसह कोकणचे निसर्गरम्य समुद्रकिनारे… सगळीकडेच पर्यटकांची गर्दी आणि सुट्टीचा जोष बघायला मिळत आहे.

पाचगणी व महाबळेश्वरमधील सर्व हॉटेलांसह पर्यटक निवासस्थानांची आगाऊ नोंदणी पूर्ण झाली आहे. अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. त्याबरोबरच पोलिसांनीही सावधगिरीची सूचना दिली असून सर्व नियम व कायदे पाळून जल्लोष करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. रात्री उशिरापर्यंत पार्टी करताना अनैतिक कृत्य, अमली पदार्थांचा वापर केला जातो. ध्वनिक्षेपक लावताना आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन करून परिसरात अशांतता निर्माण केली जाते. या सर्व संभाव्य तक्रारींबाबत सावधगिरीच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा : Sanjay Raut : “नक्की कोण कुणाचा आका?”, मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा फोटो पोस्ट करत संजय राऊतांचा गंभीर प्रश्न

नववर्ष स्वागतासाठी अनेक जण गोव्याला पसंती देत असले तरी तेथे होणारी गर्दी आणि गजबज टाळण्यासाठी अलीकडे अनेक जण कोकणाला पसंती देत आहेत. नाताळनंतर हवा अधिक थंड आणि आल्हाददायक झाली असून त्यामुळे दापोली, गुहागर, गणपतीपुळे, आरेवारे, भाट्ये चौपाटी हे किनारे पर्यटकांनी फुलून गेले आहेत. यंदाची गर्दी ही आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणारी असेल, असे जाणकारांकडून सांगितले जात आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, दिवेआगर, हरिहेश्वर तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण, देवगड, तारकर्ली येथे मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले आहेत.

महाबळेश्वर-पाचगणी, माथेरान, लोणावळा ही गिरीस्थळे तसेच कोकणचे समुद्रकिनारे सध्या पर्यटकांनी फुलून गेले आहेत. कुटुंबीय किंवा मित्रपरिवारासह पर्यटनस्थळी आलेल्यांमध्ये नववर्ष स्वागताचा उत्साह आहे.

हेही वाचा : ‘प्रीपेड मीटर’च्या विरोधात सांगतील आंदोलन

‘रेव्ह पार्ट्यां’वर नजर

●पर्यटकांच्या सुरक्षेसाठी तसेच अनैतिक कृत्ये होऊ नयेत यासाठी प्रमुख समुद्रकिनाऱ्यांवर तात्पुरत्या पोलीस चौक्या उभारण्यात आल्या आहेत. तेथे २४ तास पोलीस बंदोबस्त असेल.

●रायगड जिल्ह्यात निर्जन ठिकाणी असलेल्या फार्म हाऊसवर ‘रेव्ह पार्ट्यां’चे आयोजन होऊ नये यासाठीही पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

●२८ पोलीस ठाण्यांमध्ये विशेष पथके तयार करण्यात आली असून हॉटेल, धाबे, कॉटेज, फार्म हाउसवर करडी नजर ठेवण्यात आली आहे.