दापोली – सह्याद्रीच्या कुशीत सुमारे ४ हजार फूट उंचीवर वसलेल्या अन् तितक्याच नागमोडी वळणाचा असलेला सह्याद्रीच्या कडेकपारीतून थेट पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात जाणाऱ्या रघुवीर घाटाची अवस्था बिकटच झाली आहे. या घाटात सद्यस्थितीत दरडी कोसळण्याचे सत्र सुरूच असल्याने हा घाट प्रवासासाठी धोकादायक बनला आहे.

पावसाळ्यात सतत दरडी कोसळत असल्याने रत्नागिरी सातारा मार्गावरील दरडीचा घाट म्हणून गेल्या काही वर्षांत या घाटाने आपली ओळख निर्माण केली आहे. कोरीव सह्याद्रीचा कातळ फोडून त्यातून २ जिल्ह्यांच्या सीमा एकत्र जोडण्याचा प्रशासनाने केलेला भरीव प्रयत्न उल्लेखनीय आहे. परंतु या घाटाच्या निर्मितीनंतर घाटामध्ये पावसाळी कालावधीत निर्माण होणारी नैसर्गिक आपत्ती ही या घाटाचे मुख्य दुखणे बनली आहे.

खेड तालुक्यापासून सुमारे २२ किमी अंतरावर असलेल्या रघुवीर घाटाला पावसाळ्यामध्ये पर्यटकांची चांगलीच पसंती असते. सुमारे ३ महिने पावसाची विविध रुपे या घाटात पर्यटकांची मने मोहून टाकणारी असतात. त्यामुळे या घाटात पर्यटकांची जणू काही मांदीयाळीच पहावयास मिळते. सातारा व रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीवर सह्याद्रीच्या पर्वत रांगांमधून जाणारा रघुवीर घाट कोकणातील आता प्रमुख पर्यटन केंद्र बनण्याच्या प्रयत्नात आहे. कोयना धरणाच्या बांधकामानंतर खांदाटी खोरे म्हणून संबोधले गेलेल्या या भागातील शिंदी, कळवण, आरव, मोरणी, उचाट, याधीवळे, लामन, निवळी, अकल्पे, गाठीवली आदी गावांचा सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्याशी असलेला संपर्क जलाशयामुळे तुटला होता. १९९०-९१ पर्यंत येथील स्थानिक ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागला होता. अखेर राज्य शासनाने रत्नागिरी व सातारा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या या खोऱ्यातील नागरिकांना मानवी वस्तीशी जोडण्यासाठी १९९०-११ मध्ये खेड तालुक्यातील खोपी या गावातून या घाटाचे काम सुरु केले.

सह्याद्रीची अवघड पर्वतरांगा पार करून तसेच अनेक नैसर्गिक आपत्तीचा सामना करत अवघड असलेला हा घाट २००२ मध्ये पूर्णत्वास नेण्यास प्रशासनाला यश आले. घाटाचे काम पूर्ण झाल्यावर खांदाटी खोऱ्यातील रहिवाशांचा थेट खेड तालुक्याशी संपर्क प्रस्थापित झाला. या मार्गावर खेड- उचाट-अकल्पे ही बस देखील प्रथमच २००२ मध्ये धावल्याने देखील ग्रामस्थांचा दळण वळणचा प्रश्न निकाली निघाला.

रघुवीर घाट १० किमी अंतराचा असून या मार्गावरील ठिकाणे अत्यंत धोक्याची तसेच दरडी कोसळण्याची शक्यता असल्याने हा घाट सध्या तरी पावसाळा कालावधीत धोक्याचा भाग बनला आहे. समुद्र सपाटीपासून हा घाट ४ हजार फुटांपेक्षा उंच असल्यामुळे या ठिकाणी पावसाचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात असल्याने नैसर्गिक आपत्तीचा सामना दरवर्षी या घाटाला करावा लागतो. डोंगर माध्यांवरून घरंगळत खाली येणारा दगड मातीचा भराव तसेच मोठ मोठे खडक या रस्त्यावरती येत असल्याने पावसाळा कालावधीत हा घाट वाहतुकीसाठी पूर्णतः बंदच होत असल्याने येथील ग्रामस्थांचा शहराशी असलेला संपर्क तुटतो.

खोपी-शिरगावच्या डोंगर माथ्यावरील हा घाट पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा आहे. त्यामुळे भौगोलिक दृष्टीने असलेल्या या घाटातील अनेक समस्या आजही ‘जैसे थे’ च आहे. रस्ते उखडलेल्या अवस्थेत असून रेलीगची देखील मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घाटामध्ये अनेक प्रकारच्या वनस्पती शिवाय पावसाळ्यात दिसणारे लाल दुर्मिळ खेकडे, धबधबे असे निसर्गाची संपूर्ण ठेव असलेला हा घाट सध्याच्या घडीला दुर्लक्षीत झाला आहे. दरवर्षी डागडुजीच्या नावाखाली सत्याचे डांबरीकरण केले जाते. मात्र पावसाळ्यात ते कोसळणाऱ्या दरडीमुळे वाहून जाते. अशी विदारक स्थिती या घाटाचे झाली आहे.