Ajit Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे वेळ, आर्थिक बाबी, स्वच्छता यांच्याबाबत कडक शिस्त पाळणारे नेते म्हणून ओळखले जातात. बारामतीत असताना त्यांचा हा शिरस्ता आणखीच कडक होतो. बारामतीमधील एमआयडीसी, शैक्षणिक संस्था, दुध संघ, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, कायदा व सुव्यवस्था आणि कृषी उत्पन्न बाजार समितीवर त्यांचे बारीक लक्ष असते. रविवारी त्यांनी बारामतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जाहीर सभेत गैरकारभाराचे वाभाडे काढले. एवढेच नाही तर चुकीचे काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना स्टेजवरूनच दम दिला.
नेमके प्रकरण काय?
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (दि. २८ सप्टेंबर) पार पडली. संचालकांनी बाजार समितीमध्ये होत असलेल्या कारभाराची माहिती पत्राद्वारे दिली. हे पत्र वाचत असताना पेट्रोल पंपाची उधारी दीड ते दोन कोटींवर गेल्याचे अजित पवारांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी पदाधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली.
अजित पवार म्हणाले, ज्यांची उधारी बाकी आहे. त्यांनी ती देऊन टाकावी. कुणालाही उधार काही देऊ नये. ही संस्था शेतकऱ्यांची आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांना उधारी करण्याचा अधिकार कुणी दिला? तुमच्या बापाची मार्केट कमिटी आहे का? असा प्रश्न उपस्थित करून अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांची शाळा घेतली.
अजित पवार यांनी उधारी करणाऱ्यांची यादी यावेळी मागितली. मागच्या वेळेसही काही पुढाऱ्यांनी उधारी केली होती. त्यानंतर त्यांनी पैसे न भरल्यामुळे त्यांच्याविरोधात नोटीसा काढाव्या लागल्या, अशी आठवण अजित पवार यांनी करून दिली.
तेव्हा तुम्हाला माझी आठवण येईल
अजित पवार यांनी बारामती मतदारसंघात अनेक विकासकामे केल्याचेही यावेळी सांगितले. माझ्यासारखा सकाळी ६ वाजता उठून काम करणारा नेता तुम्हाला पुन्हा कधीही मिळणार नाही, असेही ते म्हणाले. मी जेव्हा इथली आमदारकी सोडेन, त्यावेळेस तुम्हाला माझी आठवण येईल. कधीतरी आमदारकी सोडावीच लागेल ना…
पोलीस उपअधीक्षकांना कारवाईचे आदेश
बारामती मार्केट परिसरात बाहेरचे काही तरूण मद्य पित बसतात. त्यांच्याकडे धारदार शस्त्र असतात. त्यामुळे शेतकरी, व्यापारी, हमाल यांच्यात दहशतीचे वातावरण निर्माण होते. मार्केट यार्डात सामानाची चोरी होते. ते कुणीही असू द्या, कोणत्याही पक्षात असू द्या, पण त्यांच्यावर तीन-चार केसेस टाका. चार केसेस लावल्यानंतर त्यांना मकोका लावता येतो, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस उपअधीधकांना दिले. मी बारामतीमध्ये गुंडगिरी खपवून घेणार नाही, असा थेट इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.