Ajit Pawar : विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे महाविकास आघाडीच्या बैठका तर दुसरीकडे महायुतीमधील पक्षाच्या नेत्यांमध्ये बैठकांचा धडाका सुरु आहे. तसेच अनेक नेत्यांचे विविध मतदारसंघात दौरे देखील सुरु आहेत. आता लवकरच जागावाटपही जाहीर होणार असल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात? हे पुढच्या दोन दिवसांत स्पष्ट होईल. दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता मेळावे घेण्याचा धडाका लावला आहे.

आज (१९ ऑक्टोबर) पारनेरमध्ये अजित पवारांचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी खासदार निलेश लंके यांच्यावर नाव न घेता हल्लाबोल केला. मात्र, याच सभेत अजित पवार बोलत असताना एका कार्यकर्त्याने खालून जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे अजित पवारांनी कार्यकर्त्याला चांगलंच सुनावलं. “तुला कोणी लंकेंनी पाठवलं का?”, असं म्हणत अजित पवारांनी त्या कार्यकर्त्याला सुनावलं.

नेमकं काय घडलं?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज पारनेर विधानसभा मतदारसंघात कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना अजित पवारांनी खासदार निलेश लंके यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली. मात्र, अजित पवार कार्यकर्त्यांना संबोधित करत असतानाच एका कार्यकर्त्याने खालून जोरदार घोषणाबाजी सुरु केली. यानंतर अजित पवार संतापले आणि म्हणाले, “थांब ना, मी तेच सांगतोय. तुझ्या जे मनात आहे ना तेच माझ्या बोलण्यातून बाहेर पडणार आहे. थांब जरा”, असं अजित पवार म्हणाले. मात्र, कार्यकर्ता तरीही घोषणाबाजी करत राहिला. त्यानंतर पुन्हा अजित पवार म्हणाले, “मी पण शेतकरी आहे. मलाही फार कळतं. तुला कोणी लंकेंनी पाठवलं का? ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाभळी असतात. कशाला मला बोलायला लावता?”, असं म्हणत अजित पवारांनी कार्यकर्त्यांना खडसावलं.

हेही वाचा : VIDEO : सभेत कार्यकर्त्यांच्या बॅनर फडकवत घोषणा; ‘ज्या गावच्या बोरी त्याच, गावच्या बाभळी’ असं म्हणत अजित पवारांनी खडसावलं

निलेश लंके बदलले

यावेळी अजित पवारांनी निलेश लंके यांच्यावर टीका केली. अजित पवार म्हणाले, “मागच्या काळात मीच निलेश लंकेंना राष्ट्रवादीत घेतलं, निवडून आणलं. पण माणसं एखाद्या पदावर गेले की बदलतात. तसंच निलेश लंकेंचं झालं, ते बदलले. आता खासदारकी त्यांच्याकडे (निलेश लंके), आमदारकी सुद्धा ते त्यांच्याच घरात घ्यायला निघाले आहेत. त्यामुळे जर दोन्हीही (खासदारकी आणि आमदारकी) एकाच घरामध्ये गेले तर तुम्हाला (जनतेला) कोणीही वाली राहणार नाही”, असं म्हणत अजित पवारांनी निलेश लंकेंवर हल्लाबोल केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निलेश लंकेंनी काय प्रतिक्रिया दिली?

“माझ्या मतदारसंघात गेल्यानंतर सर्वसामान्य माणसांचा जो आवाज आहे तो आवाज त्यांच्या कानावर आल्यामुळे सहाजिकच ते माझं नाव घेणारच. त्यामुळे यामध्ये वेगळं काही नाही. कारण त्या ठिकाणचा बच्चा बच्चाही हमारा नाम बोलते है. त्यामुळे येथे येणारा नेताही चुकीने का होईना माझं नाव घेणारच”, अशी प्रतिक्रिया निलेश लंकेंनी दिली.