देवेंद्र फडणवीस चाणक्य आहेत या अंधश्रद्धा आहेत अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे. भाजपाचे अनुसूचित जमाती मोर्चा ठाणे जिल्हाध्यक्ष महादेव घाटाळ यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केल्या नंतर रविवारी संध्याकाळी भिवंडी ग्रामीण मध्ये उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला. त्यावेळी सुषमा अंधारे यांनी भाजपा सह शिवसेना शिंदे गटावर सडकून टीका केली.

काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

“लोक उगाच म्हणतात देवेंद्र फडणवीस चाणक्य आहेत. मात्र ही सगळी अंधश्रद्धा आहे. चाणक्य माणसं घडवणारा आहे. आपण देवेंद्र फडणवीसांना विचारलं की तुम्ही कुणाला घडवलं तर उत्तर मिळतं कुणालाच नाही. देवेंद्र फडणवीस यांनी माणसं घडवली नाहीत. त्यांनी इकडून तिकडून सगळी भाड्याची माणसं गोळा केली आहेत. “

देवेंद्र फडणवीस जुगाडू नेते

“बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांनी माणसं घडवली. देवेंद्र फडणवीस यांनी माणसं घडवली नाहीत. त्यांनी इकडून तिकडून माणसं भाड्याने गोळा केली आहेत. देवेंद्र फडणवीस जुगाड करण्यात पटाईत आहेत माणसं घडवण्यात नाहीत. देवेंद्र फडणवीस यांनी माणसं घडवली नाहीत तर त्यांनी संपवली. त्यांनी विनोद तावडेंना संपवलं, पंकजा मुंडेंना साईडलाईन केलं, एकनाथ खडसेंना त्रास दिला असाही आरोप सुषमा अंधारेंनी केला. जे बाहेरुन घेतले होते अशांबरोबर त्यांनी काय न्याय केला? विनायक मेटेंना काय न्याय मिळाला? राजू शेट्टींबरोबर सदाभाऊ खोत का दिसत नाहीत? याचा विचार करा” असंही सुषमा अंधारे म्हणाल्या.

कपिल पाटील यांच्यावरही टीका

मला कुणीतरी सांगितलं की भिवंडी कपिल पाटील यांचा मतदारसंघ आहे. पण हीदेखील अंधश्रद्धाच आहे. कारण असा मतदारसंघ वगैरे कुणाचा नसतो. कपिल पाटील यांच्या तुलनेत तुम्हीच जास्त लाइट बिल भरता, पाणी पट्टी भरता, घर पट्टी भरता त्यामुळे हा तुमचा मतदार संघ आहे. एखाद्याचा मतदारसंघ असं काही नसतं तो तिथे राहणाऱ्यांचा मतदारसंघ असतो असंही सुषमा अंधारे म्हणाल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेतकरी शेतात कष्ट घेतो, कष्टाने धान्य पिकवतो. त्याच्या घरात धान्याच्या राशी लागतात. त्या राशी पोत्यात भरल्या जातात. एखाद्या रात्री त्याच्या घरी चोरी होते आणि पोती पळवली जातात. ते चोर पोती पळवू शकतात, धान्य पेरण्याची कला चोरु शकत नाहीत असं म्हणत सुषमा अंधारे यांनी भाजपाला टोला लगावला. तुम्ही चाळीस चोरुन नेऊ शकता, मात्र ते घडवण्याची धमक देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाही.