सांगली : अवैध गर्भपातावेळी कर्नाटकातील चिकोडीमध्ये मृत झालेल्या महिलेचे पार्थिव घेऊन मृत्यू प्रमाणपत्रासाठी डॉक्टर शोधणार्‍या पाच जणांना सांगली पोलिसांनी सोमवारी सायंकाळी पकडले. हा धक्कादायक प्रकार कर्नाटकात घडला असून मुलीच्या आई-वडिलासह चौघाविरुद्ध शून्य नंबरने गुन्हा दाखल करून अधिक तपासासाठी चिकोडी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली.

याबाबत माहिती अशी, आळते (ता. हातकणंगले जि. कोल्हापूर) येथील सविता कदम हिचा अवैधरित्या गर्भपात करत असताना चिकोडीमध्ये मृत्यू झाला. मृत महिलेचे माहेर दुधगाव (ता.मिरज) आहे. तर पती सैन्यदलात आहेत. तिला दोन मुली असून तिसर्‍यांदा गर्भवती झाल्यानंतर तिची जयसिंगपूर येथे गर्भलिंग चाचणी करण्यात आली. यानंतर तिला चिकोडी (जि. बेळगाव) गर्भपातासाठी नेण्यात आले. अवैधरित्या गर्भपात करत असताना सोमवारी सकाळी तिचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर मृत्यू प्रमाणपत्र देण्यास संबंधित डॉक्टरांनी नकार दिला. गावी आणून पार्थिवावर अंत्यविधी करण्यासाठी मृत्यू दाखला मिळविण्यासाठी मोटारीतून सांगलीत डॉक्टर शोधत तिचे नातेवाईक फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सतर्कता दाखवत बसस्थानक परिसरात संशयित मोटार शोधली असता मोटारीमध्ये चालकासह पाच व्यक्ती महिलेच्या मृतदेहासह आढळून आल्या.

हेही वाचा – सांगली : दो फूल, एक माली…

हेही वाचा – शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करणार? शिक्षणमंत्री केसरकर म्हणाले, “तो श्लोक अतिशय चांगला…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ चारही संशयितांना ताब्यात घेतले असून यामध्ये मृत महिलेची आई, वडील, भाऊ, गावातील तथाकथित डॉक्टर आणि चालक अशा पाच जणाविरुद्ध शून्य क्रमांकाने गुन्हा दाखल करून पुढील तपासासाठी चिकोडी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असल्याचे निरीक्षक मोरे यांनी सांगितले.