भंडारा येथून ६ किलोमीटर अंतरावरील एका शेतशिवारात पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळून आला. ही घटना भंडारा वनपरिक्षेत्र कार्यालया अंतर्गत येणाऱ्या डोडमाझरी गटातील एका खासगी शेतशिवारात शुक्रवारी (२८ जानेवारी) दुपारी ३ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
रुद्र बी २ असे मृतावस्थेत आढळलेल्या पट्टेदार वाघाची ओळख आहे.

भंडारा-कलकत्ता राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या भिलेवाडा येथून जवळच असलेल्या पलाडी शेतशिवारात ही घटना उघडकीस आली. अशोक दसाराम भोंगाडे यांच्या गट क्रमांक ४२ मधून वाहणाऱ्या नाल्यालगत एक पट्टेदार वाघ मृतावस्थेत असल्याची माहिती परिसरातील शेतकऱ्यांना दुपारी ३ वाजताच्या सुमारास लक्षात आली. याची माहिती ग्रामस्थांनी तातडीने भंडारा वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक राजूरकर यांना दिली.

वाघाच्या तोंडातून रक्त निघालेले आढळले

ग्रामस्थांकडून माहिती मिळताच वनाधिकारी राजूरकर हे आपल्या वन कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. यावेळी प्रथमदर्शनी वाघाच्या तोंडातून रक्त निघालेले दिसले. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरून सदर वाघ मार्गक्रमण करत असताना कदाचित एखाद्या वाहनाला त्याची धडक बसली असावी आणि त्यात तो जखमी होऊन मृत पावला असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा : Video : बुलढाण्यातील वस्तीत शिरला वाघ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घटनास्थळ परिसर कोका अभयारण्यालगत असल्याने हा वन्य प्राण्यांचा मार्ग म्हणून ओळखला जातो. घटनास्थळी उपवनसंरक्षक एस. बी. भलावी, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, कारधाचे ठाणेदार राजेश थोरात, क्षेत्र सहाय्यक आय. एम. सय्यद, बिटरक्षक ए. एन. नरडांगे, क्षेत्र सहायक नागदेवे, वनकर्मचारी सचिन नरड यांच्यासह वनकर्मचारी घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, मृत वाघाच्या शवविच्छेदनासाठी पशुधन विकास अधिकारी डॉ गुणवंत भडके हे आपल्या पथकासह पोहोचले.