शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार आणि ‘सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्राचे संपादक संजय राऊत यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची एक मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीचा पहिला भाग आज प्रसारित करण्यात आला आहे. या भागात संजय राऊत उद्धव ठाकरे यांना म्हणाले, तुमच्या नेतृत्वाखालील सरकार मागच्या वर्षी मुसळधार पावसात वाहून गेलं… त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, “सरकार वाहून गेलं नाही तर खेकड्याने धरण फोडलं.” उद्धव ठाकरेंचा रोख मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे होता.

गेल्या वर्षी २१ जून २०२२ या दिवशी एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेतृत्वाला म्हणजेच पक्षप्रमुख आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच थेट आव्हान दिलं. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ४० आमदारांना बरोबर घेत वेगळा गट स्थापन केला. त्याचबरोबर शिंदे यांनी शिवसेनेतील खासदार, विधान परिषदेतील आमदार आणि पदाधिकाऱ्यांना बरोबर घेत थेट शिवसेना या पक्षावरच दावा केला. निवडणुक आयोगानेही एकनाथ शिंदेंच्या पक्षाला खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली. दरम्यान, एकनाथ शिंदेंच्या या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे यांचं सरकार कोसळलं. यावर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं होतं.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यावर आता शिंदे गटाकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. मंत्री दीपक केसरकर याबाबत म्हणाले, ते (उद्धव ठाकरे) स्वतः म्हणजे धरण नाही, धरण हे कसं असतं? धरण हे अभेद्य असतं. मातीची जी धरणं असतात ती धरणं खेकडे पोखरू शकतात. जी धरणं भरभक्कम असतात ती फुटत नाहीत. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार भरभक्कम धरणांसारखे आहेत. अशी धरणं कधीही फुटू शकत नाहीत.

दीपक केसरकर म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच संपूर्ण देशाला मार्गदर्शन केलं आहे. परंतु त्यांच्या मार्गापासून तुम्ही (उद्धव ठाकरे) वेगळे झाले आहात. त्यांच्या मार्गावरून वेगळे होऊन ते मुख्यमंत्री झाले होते, त्याचप्रमाणे आता त्यांची पंतप्रधान व्हायची इच्छा असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. त्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही.

हे ही वाचा >> “अमित महाराष्ट्रभर टोलनाके…”, तोडफोडीच्या घटनेवर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

विरोधी पक्षांच्या एकजुटीवर दीपक केसरकर म्हणाले, अशा पद्धतीने वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक एकत्र येऊन कधीही लढा उभा राहत नसतो. लढा हा देशाच्या हितासाठी असू शकतो. आज देशाचं हित पंतप्रधान नरेंद्र मोदीच साधू शकतात आणि ही वस्तूस्थिती आहे.