महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये दंगली आणि राडे यामुळे राज्यातलं राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघालं आहे. अहमदनगर, अकोला, अमळनेर आणि कोल्हापुरात गेल्या काही दिवसांमध्ये अनेकदा तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. मुघल बादशाह औरंगजेबाचं समर्थन, त्याचे पोस्टर यावरून राडे झाल्याचं पाहायला मिळालं. या घटनांवरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत. राज्यात जातीय तेढ निर्माण केली जात आहे, असा आरोप विधान सभेचे विरोधी पक्षनते अजित पवार यांनी केला आहे.

राज्यात जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा कुठे अशी दंगल झाली नाही, परंतु भाजपा-शिंदे गटाच्या सरकारच्या काळात अशी स्थिती सातत्याने निर्माण होत असल्याचा आरोप महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी केला आहे. यावर आता शिंदे गटाने प्रत्युत्तर दिलं आहे.

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सरकारवर दंगलींवरून होणाऱ्या आरोपांना उत्तर दिलं आहे. केसरकर म्हणाले, दंगली करणारेच सत्तेत बसले की दंगली होणारच नाहीत. त्यांनी (महाविकास आघाडीने) दंगली केल्या असं मी म्हणणार नाही. परंतु कोल्हापुरात दंगल झाली. मी स्वतः कोल्हापूरचा पालकमंत्री आहे. कोल्हापूरच्या दंगलीत कोल्हापूर शहरातला एकही मनुष्य दगड मारायला नव्हता. ही सगळी माणसं बाहेरून आली होती. या लोकांना कोल्हापुरात कोणी पाठवलं.

हे ही वाचा >> “अजित पवारांनी सरकारमध्ये यावं, ते खूप…”, दीपक केसरकरांची खुली ऑफर

दीपक केसरकर म्हणाले राज्यात दंगली होतील असे अंदाज दोन दोन महिने आधीच तुमच्या लोकांनी वर्तवले होते. हे लोक एक-एक महिने आधी दंगलींचे अंदाज कसे वर्तवतात? मला इतकंच म्हणायचं आहे की, सामाजिक ऐक्य टिकवणं सगळ्यांचं काम आहे. तुम्ही लोकांना भडकवणार आणि आम्ही दंगली केल्या म्हणून आमच्यावर आरोप करणार, हे चालणार नाही. तुम्ही लोकांनी कोल्हापूरसंदर्भात आधीच वक्तव्य केलं होतं. कोल्हापुरात दंगल होणार याचा अंदाज आधीच वर्तवला होता. परंतु दोन महिने आधी तुम्हाला कळलं कसं? असा प्रश्न केसकर यांनी यावेळी उपस्थित केला, ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.