सातारा जिल्ह्यात एकीकडे महाबळेश्वरसारखा अतिवृष्टीचा तालुका, तर माण-खटाव हा दुष्काळी भागही याच जिल्ह्यात आहे. माण-खटावमध्ये आता पाण्याच्या टँकरची मागणी सुरु झाल्याने गेल्या वर्षी मुख्यमंत्री याबाबत काय तोडगा काढणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
गेल्यावर्षी पाण्याची जमिनीतील पातळी कमी झाल्याने सिमेंटचे बंधारे बांधण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला. यासाठी दहा हजार कोटी रुपये राज्यात खर्च करण्याचे ठरले. उदाहरणादाखल माणमध्ये काही सिमेंटचे तलाव आणि बंधारे तयार करण्यात आले. या बंधाऱ्यात साठलेल्या पाण्यात मुख्यमंत्र्यांसह आ. जयकुमार गोरे यांनी बोटींग केले. विरोधकांनी यावर टीकेची झोड उठवली होती. काँग्रेसच्या मित्रपक्षाचे, राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई यांनी बोटींगसाठी दुसऱ्या बंधाऱ्यावरुन पाणी आणल्याचा आरोप केला होता. आज खटाव येथे १० मोठय़ा गावांसह १४  वाडय़ावस्त्यांनी टँकरसाठी मागणी अर्ज तहसीलदारांकडे दाखल केले आहेत. तर ७गावातील कूपनलिकांचे अधिग्रहण प्रस्ताव दाखल झाले आहेत. एखाद्या गावाकडून आलेल्या प्रस्तावावर प्रशासन अद्याप विचार करत नाही, याचे कारण टँकर पुरवठा यंत्रणा अद्याप कार्यान्वित झाली नाही. तसेच पाणी भरले जाते तिथून गाव लांब असेल तर त्याच्या खर्चाचा प्रश्न कसा सोडवायचा याच्या सूचना यंत्रणेकडे नाहीत. त्यामुळे ग्रामपंचायतीची मागणी वाढत असली तरी पाण्याचा प्रश्न लोकसभा निवडणुकांचे निकाल लागेपर्यंत सुटणार नाहीत.