अतिवृष्टीमुळे आणि परतीच्या पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, राज्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. राज्य सरकारने दिवाळीपूर्वी ओला दुष्काळ जाहीर करून मदत खात्यात जमा करावी अशी मागणी विरोधकांकडून केली जात होती. मात्र राज्य सरकारने ओला दुष्काळाबाबत अद्याप निर्णय घेतला नाही. यामुळे विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून ही मागणी लावून धरली जात आहे आणि राज्य सरकारवर टीकाही केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.

प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “महाविकास आघाडीतील अनेक नेते हे सातत्याने ओला दुष्काळ जाहीर व्हावा अशी मागणी करत आहेत. जर सण साजरे करून किंवा भेटी जर संपल्या असतील आणि कुणाला वेळ मिळाला आणि ते जर शेतकऱ्यांच्या बांधावर गेले, तर त्यांना परिस्थिती काय आहे कळेल. राज्यात अतिशय गंभीर परिस्थिती आहे.”

हेही वाचा – MCD election : “दिल्लीत एकही भाजपावाला राहणार नाही, सर्वांचं….”; अरविंद केजरीवालांचं विधान

याशिवाय “प्रसारमाध्यमांद्वारेही आम्हाला अनेक घटना बघायला मिळाल्या, काही आम्हाला आमच्या मतदारसंघात, जिल्ह्यातही बघायला मिळाल्या. मला सर्वात वेदना देणारी जर कुठली गोष्ट मी पाहीली असेल मागील काही दिवासांत, तर एक सोशल मीडियावरच माझ्याकडे एक व्हिडीओ आला होता, तो यवतमाळच्या शेतकऱ्याचा होता. तो एवढच म्हणत होता की चिन्ह आणि या सगळ्या लढाया सोडून, आताच्या सरकारने थोडासा वेळ हा जर शेतकऱ्यांसाठी दिला तर खूप बरं होईल. प्रचंड वेदना देणारा तो व्हिडीओ होता. मुलीच्या आवाजातील एक पाच मिनिटांचा व्हिडीओही माझ्याकडे आला होता, तो आम्हालाही उद्देशून होता की सगळ्या आमदार, खासदारांना हा व्हिडीओ दाखवा की आज शेतकरी किती अडचणीत आहे.” असंही यावेळी सुळे यांनी सांगितलं.

याचबरोबर “मला असं वाटतं की एक गोष्टीची आपण जाणीव ठेवली पाहिजे की, कोविडच्या काळात सगळे लॉकडाउनमध्ये होते. परंतु एक व्यक्ती असा होता की जो सातत्याने प्रत्येक बांधावर काम करत होती. तो म्हणजे या देशातला शेतकरी. कोविडच्या काळात अनेक गोष्टी कमी पडल्या, पण अन्न अजिबात कमी पडू दिलं नाही आणि त्याचं संपूर्ण श्रेय हे जातं या देशातील, काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्याला.” अशा शब्दांमध्ये सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर “ हे असंवेदनशील सरकार आहे आणि मंत्रालयात येऊन आढावा घेणं, बांधावर जाऊन आढावा घेणं हे काहीच आपल्याला दिसत नाही. मला असं वाटतं कोणतरी तीन महिन्यांचा आढावा घ्यावा, की मंत्रीमंडळाच्या बैठका किती झाल्या?, मंत्रालयात कितीवेळ हे सरकार होतं?, दौऱ्यावर जेव्हा हे सरकार होतं तेव्हा ते मेळाव्यासाठी होतं की जनतेसाठी होतं?, जिल्धिकाऱ्यांचा प्रत्यक्ष कितीवेळा आढावा घेतला?, पालकमंत्री किती आढावा घेत आहेत?” असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टीका केली.