विधिमंडळ अधिवेशन म्हटलं की आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे, राजकीय कलगीतुरा या सगळ्या गोष्टी ओघानंच आल्या. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना अडचणीच्या मुद्द्यांवर प्रश्न विचारून खिंडीत गाठण्याचे प्रयत्न होतात, तर सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांना सडेतोड प्रत्युत्तरं दिली जातात. मात्र, त्यातूनही काही सदस्यांच्या मिश्किल शैलीमुळे त्यांची भाषणं हा अधिवेशनातला चर्चेचा विषय ठरतो. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे त्यातलेच एक नेते! विधानपरिषदेच्या १० सदस्यांची येत्या दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये टर्म संपत असताना अजित पवारांनी बुधवारी केलेल्या निरोपाच्या भाषणामुळे सभागृहातलं एरवी तापलेलं वातावरण हास्याच्या लकेरींनी हलकं-फुलकं झाल्याचं पाहायला मिळालं.

“जयंत पाटलांशी त्यांच्या काय गप्पा होतात कुणास ठाऊक”

विधानपरिषदेची टर्म संपणाऱ्या आमदारांमध्ये सदाभाऊ खोत यांचा देखील समावेश आहे. त्यांना टोला लगावताना अजित पवारांनी त्यांची राजकीय कारकिर्द आणि मित्रममंडळींवरून मिश्किल टिप्पणी केली. “स्वाभिमानीच्या कोट्यातून सदाभाऊ खोत यांची सभागृहात एंट्री झाली. राज्यमंत्री म्हणूनही कामाची संधी मिळाली. पण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सदाभाऊ खोत यांच्याशी हात सुटला. आता ते एकटेच पुढे चालले आहेत. मध्येमध्ये जयंत पाटील यांच्याशीही ते गप्पा मारत बसतात. आता ते काय गप्पा मारतात हे काही माहीत नाही. पण त्यांची जवळीच चांगली आहे. त्यांचं कधी फार जमायचं नाही. पण राजकारणात कोण कुणाचं कायमचं शत्रू किंवा मित्र नसतं. हे कुणी नाकारू शकत नाही, आपण खूप जणांनी त्याचा अनुभव घेतला आहे”, असं अजित पवार म्हणताच काही सदस्यांनी त्यात ‘अर्थपूर्ण’ होकार भरला!

रापलेले सदाभाऊ आणि त्यांचा पेहेराव!

यावेळी बोलताना अजित पवार यांनी सदाभाऊ खोत यांच्या पेहेरावावर देखील केलेली टिप्पणी सभागृहासोबतच खुद्द सदाभाऊ खोत यांचीही दिलखुलास दाद मिळवून गेली. “सदाभाऊंचा पेहेराव आता बदलला आहे. पांढऱ्या शर्टाची घडी आता फारशी मोडत नाही. पूर्वी रापलेल्या सदाभाऊंचा चेहरा आता काही फारसा रापलेला दिसत नाही. कारण सभागृहात बसावं लागतं. एसी वगैरे आहे. आता ते निखरू लागले आहेत. सदाभाऊंच्या चेहऱ्यावर हे नवं तेज असंच कायम राहावं या शुभेच्छा”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.

“उठसूट शीर्षासनाचं धाडस कुणी करू नका”

दरम्यान, यावेळी आमदार संजय दौंड यांनी निषेध करण्यासाठी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घातलेलं शीर्षासन बरंच चर्चेत राहिलं. त्याचीही आठवण अजित पवारांनी करून दिली. “दौंड यांच्या शीर्षासनाची आख्ख्या राज्यात चर्चा झाली. मला लोक म्हणायचे, तुमचे आमदार शीर्षासन करतात, काय काय करतात. मी म्हटलं हे सगळं जमतं म्हणून ते आमदार आहेत. ते नियमित व्यायाम करतात. त्यांच्या अनोख्या आंदोलनामुळे सगळ्यांनी त्यांची दखल घेतली. नियमित व्यायामामुळे सराव महत्त्वाचा असतो. त्यामुळे शीर्षासन करण्याचं धाडस उठसूठ कुणी करू नये. संजय दौंड शीर्षासन करतात म्हणून कुणी शीर्षासन करू नका. आमचे परिचित शीर्षासन करतानाच गेले”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.

“आता कुणी कुणाचे लाड केले आणि कुणी कुणाला प्रसाद दिला, ते काही…”, अजित पवारांची विधानपरिषदेत चौफेर टोलेबाजी!

“अनेकजण बांधावरचे नसून कागदावरचे शेतकरी असतात. पण संजय दौंड हाडाचे शेतकरी आहेत”, असं म्हणत अजित पवारांनी संजय दौंड यांचं कौतुक देखील केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“प्रकाश तर काहीही करू शकतो!”

दरम्यान, अजब प्रकारच्या आंदोलनांचा विषय निघताच सभागृहातील काही सदस्यांनी आमदार प्रकाश गजभियेंची अजित पवारांना आठवण करून दिली. त्यावर खोचक टोला लगावताना अजित पवार म्हणाले, “प्रकाश तर काहीही करू शकतो. त्याच्या नावातच प्रकाश आहे”!