महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या चर्चा सुरु आहे ती ठाकरे बंधूंची. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले. या दोघांचे दोन पक्ष मिळून महापालिका निवडणूक लढवतील असं संजय राऊत आत्मविश्वासाने सांगत आहेत. त्यामुळे आगामी काळात काय होईल हे पाहणं महत्त्वाचं असेल. दरम्यान आज उद्धव ठाकरे यांनी इतक्या वर्षांत पहिल्यांदाच राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या दादर येथील निवासस्थानी सहकुटुंब भेट दिली. या भेटीची चर्चा रंगलेली असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन गणरायचं दर्शन घेतलं.

उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीसही राज ठाकरेंना भेटले

महाराष्ट्रासह देशभरात गणेश उत्सव उत्साहाने आणि आनंदात सुरु झाला असला तरीही या निमित्ताने होणाऱ्या राजकीय भेटीगाठी महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब राज ठाकरेंच्या निवासस्थानी येत सहभोजन घेतलं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. ही भेट राजकीयदृष्ट्याही महत्त्वाची मानली जाते आहे. येणाऱ्या महापालिका निवडणुकींच्या दृष्टीने नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तसंच याची चर्चाही होते आहे.

देवेंद्र फडणवीस यांची पोस्ट काय?

मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या मुंबई येथील निवासस्थानी आज भेट देऊन गणपती बाप्पाचे मनोभावे दर्शन घेतले व आशीर्वाद प्राप्त केला आणि सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. अशी पोस्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. आहे. दरम्यान या दोन नेत्यांमध्ये चर्चाही झाली. ती चर्चा काय झाली हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.

महापालिका निवडणुका लवकरच

महापालिका निवडणुका लवकरच पार पडतील अशी चिन्हं आहेत. दिवाळी आटोपल्यावर नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात निवडणुका घेतल्या जातील असे संकेत मिळत आहेत. दरम्यान याबाबतच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. एप्रिल महिन्यात राज ठाकरेंनी महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंसह असलेले मतभेद विसरुन टाळी देण्याची भाषा केली होती. त्यावर उद्धव ठाकरेंनीही सकारात्मक प्रतिसाद दिला होता. मराठीच्या मुद्द्यावर विजयी मेळाव्यात ५ जुलै रोजी ठाकरे बंधू एकत्र आले होते. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीसह आहेत. राज ठाकरे महाविकास आघाडीसह जाणार का? हा मुख्य प्रश्न आहे. तसंच राज ठाकरे यांनी २७ जुलैला उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी मातोश्रीवर जाऊन भेट घेतली होती. तर आज उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थावर आले होते. मागची दोन दशकं राजकीय शत्रू असलेले ठाकरे बंधू आता एकत्र आले आहेत. ही युती होते की आणखी काय घडतं? याची उत्तरं निवडणूक जवळ आल्यावर मिळतीलच. राज ठाकरे यांचे सगळ्याच राजकीय पक्षांशी जवळचे संबंध आहेत. भाजपासह जाण्याचा पर्यायही त्यांनी निवडला तर आश्चर्य वाटायला नको. दोन भावांचं मनोमीलन कायम राहतं की भाजपा आणि महायुतीच्या बरोबर राज ठाकरे जातात हे पाहणं रंजक असेल. आता या सगळ्यात गणेश उत्सवात देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली आजची भेट महत्त्वाची मानली जाते आहे.