Devendra Fadnavis Meets Vantara Officials : कोल्हापूरमधील नांदणी मठातील माधुरी ऊर्फ महादेवी हत्तीण गुजरातमधून (वनतारा पशूसंवर्धन केंद्र) परत आणावी, ही जनभावना लक्षात घेऊन नांदणी मठ व राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी, असा निर्णय घेण्यात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (५ ऑगस्ट) जाहीर केलं होतं. पाठोपाठ फडणवीसांनी आज (६ ऑगस्ट) ‘वनतारा’मधील अधिकाऱ्यांशी चर्चा करून महादेवीला परत आणण्यासाठी राज्य सरकारचा अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. फडणवीस म्हणाले, “राज्य शासन मठाच्या पाठीशी असून सर्वोच्च न्यायालयात हत्ती परत देण्यासंदर्भात भूमिका मांडेल.”
दरम्यान, वनताराच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीची फडणवीस यांनी समाजमाध्यमांद्वारे माहिती दिली आहे. ते म्हणाले, “वनतारा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकार्यांसोबत मी आज मुंबईत सविस्तर चर्चा केली. महादेवी हत्तीण (माधुरी) पुन्हा सुखरुप नांदणी मठाकडे परत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जी याचिका करण्याचे ठरवले आहे, त्यात सहभागी होण्याचा निर्णय वनताराने घेतला असल्याचे त्यांनी मला आश्वस्त केले आहे. या चर्चेदरम्यान त्यांनी मला सांगितले की, आम्ही केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं पालन केलं आणि महादेवी हत्तिणीचा ताबा घेण्याचा आमचा कुठलाही प्रयत्न नव्हता.”
महादेवी हत्तिणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठानजिक वन विभागाने निवडलेल्या जागेवर या महादेवी हत्तिणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करण्याची तयारीसुद्धा वनताराने दर्शवली आहे. विविध समाजांच्या धार्मिक भावनांचा आम्ही सन्मानच करतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले.”
राज्य सरकारचा अॅक्शन प्लॅन तयार
महादेवी हत्तिणीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केल्यानंतर महाराष्ट्राचा वनविभाक सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्रपणे भूमिका मांडेल. यामध्ये केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या निकषाप्रमाणे व उच्चस्तरीय समितीने सुचवलेल्या सर्व मुद्द्यांचं निराकरण केलं जाईल. महादेवीची काळजी घेण्यासाठी, तिची निगा राखण्यासाठी डॉक्टरांसह राज्य सरकार एक पथक तयार करून आवश्यक ती सर्व मदत करणार असल्याचं आश्वासन फडणवीस यांनी दिलं आहे.
फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंत्रिमंडळ सभागृहात महादेवी हत्तिणीच्या प्रश्नासंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, वन मंत्री गणेश नाईक देखील उपस्थित होते.