नांदेड: नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकरी व इतर बाधितांना आर्थिक मदतीसह वेगवेगळ्या सवलती जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे नेते पक्षाच्या विभागीय बैठकीस शुक्रवारी (दि.१०) छ.संभाजीनगरात येत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीसंदर्भात भाजपाने सलग तीन दिवस विभागीय बैठकांचे सत्र निश्चित केले आहे.
मराठवाडा विभागीय बैठकीसाठी सर्व जिल्हाध्यक्ष, पक्षाचे विभागातील मंत्री, खासदार, आमदार व प्रत्येक संघटनात्मक जिल्ह्यातील निवडक पदाधिकार्यांना आमंत्रित करण्यात आले आहे; पण माजी आमदारांना या बैठकीचे निमंत्रण नाही. ही बैठक औरंगाबाद जिमखाना क्लबमध्ये दुपारी १ वाजता सुरू होणार आहे. माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण यांनी आधी ९ ते ११ ऑक्टोबरदरम्यान नांदेड जिल्ह्यात काही कार्यक्रम निश्चित केले होते; पण वरील बैठकीमुळे त्यांचे नियोजित कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले आहेत.
भाजपाने मराठवाड्यात विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीची तयारी सुरू केली असून त्याची एक व्यापक बैठक काही दिवसांपूर्वी छ.संभाजीनगरात झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी प्रशासकीय पातळीवरील प्रक्रिया गतिमान झालेली असताना, आता राजकीय पातळीवर पूर्वतयारीची व्यापक बैठक सर्वप्रथम भाजपाची होत आहे. संभाजीनगरच्या आधी नाशिक विभागाची बैठक सकाळी ९ ते १ या कालावधीत होईल. दुसर्या दिवशी पुणे तसेच ठाणे-कोकण विभागाची तर १३ ऑक्टोबर रोजी अमरावती व नागपूर विभागाची बैठक होणार आहे.
मागील दीड-दोन वर्षांत मराठवाड्यामध्ये काँग्रेस आणि इतर पक्षांतील प्रमुख नेते भाजपामध्ये दाखल झाले. यांतील काँग्रेसच्या अशोक चव्हाण व काही नेत्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रांत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्या पक्षाचा वरचष्मा राखला होता. त्यांच्या भाजपा प्रवेशानंतर उक्त संस्थांच्या निवडणुका दीर्घ प्रतीक्षेने होत असल्यामुळे भाजपाला नव्या नेत्यांकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
नांदेड जिल्ह्यात २०१७ ते २०२२ या कालखंडात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपाचे प्रतिनिधित्व अत्यंत नगण्य तर काँग्रेसचे लक्षणीय होते. ते चित्र उलटविण्याची मोठी जबाबदारी चव्हाण व त्यांच्या चमूवर आली आहे. मागील दीड वर्षांत नांदेडमध्ये लोकसभेची निवडणूक आणि मग पोटनिवडणूक झाली; पण दोन्ही वेळा भाजपाचा पराभव झाल्याने अशोक चव्हाण निष्प्रभ ठरले होते. आता नव्या निवडणूक हंगामात त्यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.
मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांच्या प्रमुख उपस्थितीत छ.संभाजीनगरात होणार्या बैठकीची नेमकी माहिती बाहेर आलेली नाही; पण शहरी आणि ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना सक्रिय व कृतिशील होण्याचा संदेश बैठकीद्वारे दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले; पण शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या भागीदार पक्षांसमवेत युती करायची किंवा कसे, हा विषय बैठकीमध्ये नसला, तरी त्यावर ऐनवेळी चर्चा होऊ शकते, अशी माहिती प्राप्त झाली.
संघटनात्मक जिल्ह्यांतून १५ जण निमंत्रित
वरील बैठकीसाठी प्रत्येक जिल्ह्याती सर्व पदाधिकार्यांना पाचारण न करता, सर्व जिल्हाध्यक्षांकडून १५ प्रमुख कार्यकर्त्यांची नावे मागविण्यात आली. त्यांना बोलविण्यात आले आहे. मराठवाड्यात भाजपाचे १५ संघटनात्मक जिल्हे असून त्यांतील सव्वा दोनशे निमंत्रित कार्यकर्ते अपेक्षित असल्याची माहिती मिळाली.