Devendra Fadnavis On Gopichand Padalkar-Jitendra Awhad : राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक विविध मुद्यांवरून आमने-सामने येत असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, असं असतानाच विधानभवन परिसरात गुरुवारी एक धक्कादायक प्रकार घडला. भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीची घटना घडली. या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले.
या घटनेवर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. विधानभवन परिसरात घडलेल्या या हाणामारीच्या घटनेप्रकरणी अतिशय कडक कारवाई करण्याची विनंती विधानसभेच्या अध्यक्षांना केल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसेच राहुल नार्वेकर यांनी देखील या प्रकरणावर अतिशय कडक कारवाई करणार असल्याचं सांगितलं आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
“विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी. या संदर्भात जी कडक कारवाई असेल ती कारवाई करावी. अशा प्रकारची विनंती मी विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे. मला असं वाटतं की अशा प्रकारे एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक जमा होतात आणि मारामारी करतात. हे विधानसभेला शोभणारे नाही. त्यामुळे या प्रकणावर निश्चितच कारवाई झाली पाहिजे”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
राहुल नार्वेकर काय म्हणाले?
“अतिशय कडक कारवाई होणार, या सर्व प्रकरणासंदर्भातील मी अहवाल मागवला आहे. हा अहवाल आला की पुढील भूमिका स्पष्ट करेन. या प्रकरणाचा अहवाल येईपर्यंत मी या प्रकरणावर जास्त बोलणार नाही. अहवाल आल्यानंतर फौजदारी कारवाई केली जाणार आहे. माझ्याकडे जे अधिकार आहेत, त्या स्थरावर योग्य ती कारवाई होईल”, असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे.
वादाची सुरुवात कशी झाली?
मागच्या आठवड्यात जितेंद्र आव्हाड यांनी विधिमंडळात प्रवेश करत असताना “मंगळसूत्र चोराचा.., मंगळसूत्र चोराचा…” अशी घोषणाबाजी केली होती. यावेळी त्यांनी कुणाचेही नाव घेतले नव्हते. मात्र त्यांनी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांना लक्ष्य केल्याचे सांगितले जाते. यानंतर १६ जुलै रोजी आमदार गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या विधिमंडळाच्या गेटवर बाचाबाची झाली. गोपीचंद पडळकर यांनी आपल्या गाडीचा दरवाजा जोरात उघडल्यामुळे तो आमदार जितेंद्र आव्हाड आणि संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना लागल्याचा आरोप आव्हाड यांच्याकडून करण्यात आला. या सर्व घडामोडीनंतर आज गुरुवारी १७ जुलै रोजी दोन्ही आमदारांचे कार्यकर्ते भिडले आणि त्यांनी विधिमंडळाच्या लॉबीतच हाणामारी केली.