Devendra Fadnavis On Uddhav and Raj Thackeray : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. अनेक नेत्यांचे राज्यातील विविध भागांत दौरे सुरू असून पक्ष संघटनेचा आढावा घेतला जात आहे. या पार्श्वभूमीवर आज भारतीय जनता पक्षाचा मुंबईत विजय संकल्प मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. मुंबईतील बेस्ट सहकारी पतपेढीच्या निवडणुकीचा दाखल देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. ‘बेस्टच्या निवडणुकीत ठाकरे ब्रँडचा बँड वाजवला’, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“आम्ही २०२४ मध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आणून दाखवलं. आता महापालिकेच्या निवडणुकीकडे आपण चाललो आहोत. आता काही झालं तरी मुंबईमध्ये महायुतीचा झेंडा फडकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. मुंबईत महायुतीचा महापौर केल्याशिवाय भाजपाचा एकही कार्यकर्ता राहणार नाही. कोणी बरोबर आलं तरी किंवा कोणी बरोबर नाही आलं तरी आणि कोण कोणाला बरोबर घेतंय तरी देखील मुंबईत महायुतीचाच महापौर होईल”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

‘ठाकरे ब्रँडचा बँड वाजवला’ : देवेंद्र फडणवीस

“खरं म्हणजे काही लोक आपलं हसू करून घेतात. साधी बेस्टची निवडणूक होती. आम्ही सांगितलं की कशाला पक्षावर लढायचं? मात्र, काहीजण म्हणाले की आमचा ब्रँड आहे, आमचा ब्रँड आहे. आमच्या शंशाक राव आणि प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांनी बेस्टच्या निवडणुकीत ब्रँडचा बँड वाजवला”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर केली.

‘जगातला सर्वात मोठा ब्रँड आमच्याकडे’

“एक लक्षात घ्या, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ब्रँड होते. पण तुम्ही ब्रँड नाहीत. फक्त नाव लावल्याने कोणीही ब्रँड बनत नाही. भारतीय जनता पक्षात आमची परंपरा पाहा. अमित साटम साधे कार्यक्रेत, पण ते देखील मुंबई भाजपाचे अध्यक्ष झाले. आशिष शेलार यांच्यानंतर त्यांचा मुलगा अध्यक्ष झाला नाही. अमित साटम अध्यक्ष झाले, ही भाजपाची परंपरा आहे. भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. या पक्षात नेतृत्व जनतेतून तयार होतं. त्यामुळे आमच्याकडे चहा विकणारा जागतिक ब्रँड म्हणून जगात एस्टॅब्लिश होतो. अशा प्रकारचा ब्रँड निर्माण करणारा आमचा पक्ष आहे. आम्हाला कोणीही ब्रँड सांगू नये. जगातला सर्वात मोठा ब्रँड आमच्याकडे आहे, त्या ब्रँडचं नाव नरेंद्र मोदी असं आहे”, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.