मुख्यमंत्रीपदासाठी अजित पवार सक्षम आहेत का?; देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर

जुलैमध्ये वाढदिवस असणारे मुख्यमंत्री होतात का? या प्रश्नाचं दिलं उत्तर

Ajit-Pawar-Fadanvis2
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोघांचाही वाढदिवस एकाच दिवशी म्हणजे २२ जुलै रोजी असतो.

एकमेकांचे राजकीय विरोधक असलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांचाही वाढदिवस नुकताच होऊन गेला. राजकारणातल्या या विरोधकांचा वाढदिवस योगायोगाने एकाच दिवशी येतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही वाढदिवस नुकताच होऊन गेला. यावरुनच फडणवीसांना प्रश्न विचारण्यात आला की, जुलैमध्ये वाढदिवस असणारे मुख्यमंत्री होतात का? त्यावेळी त्यांनी मिश्किल शैलीत अजित पवारांना चिमटा काढला आहे. तसंच अजित पवार यांच्यात मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची क्षमता आहे का? या प्रश्नालाही फडणवीसांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिलं आहे.

एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी याविषयी भाष्य केलं आहे. ते म्हणाले, तुम्ही याविषयी अजित पवारांना विचारलंत तर त्यांना जास्त आनंद होईल. कारण त्यांचाही जुलैचा वाढदिवस आहे. पण त्यांची संधी बऱ्याचदा हुकलीये पण आता त्याबद्दल काय सांगायचं?

अजित पवार यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे का असं विचारलं असता राज्यासमोर अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदापेक्षाही महत्त्वाचे प्रश्न सध्या आहेत, असं म्हणत त्यांनी उत्तर देणं टाळलं.

हेही वाचा – उद्धव ठाकरेंशी असलेल्या नात्याबद्दल देवेंद्र फडणवीस म्हणाले,….

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोघांचाही वाढदिवस एकाच दिवशी असतो. त्या दिवशी दोघांनीही एकमेकांविषयी वर्तमानपत्रामध्ये लेख लिहिला होता. या लेखाच्या संदर्भानेच फडणवीस यांना विचारण्यात आलं की, मग तुमचं आणि अजित पवार यांचं नातं कसं आहे?

त्यावेळी ते म्हणाले, प्रश्न नात्याचा नाही. एका वृत्तपत्राने आम्हाला दोघांना एकमेकांविषयीचा लेख मागितला. आता एवढी वर्षे अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत. त्यामुळे त्यांचं काही ना काही कर्तृत्व तर नक्कीच आहे. वेगवेगळ्या पदांवर त्यांनी काम केलं आहे. त्यांची कामाची एक वेगळी शैली आहे. त्यामुळे त्यांच्या काही गोष्टींबद्दल आमचं दुमत असेल, काही गोष्टींबद्दल विरोध असेल. पण त्यांनी महाराष्ट्रासाठी दिलेलं योगदान मान्य करणं ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे. आणि म्हणून मी लेख लिहिला. त्यांनीही माझ्या कार्याविषयी त्यांना जे वाटतं त्याबद्दल लेख लिहिला आहे. त्यापलीकडे याकडे पाहण्याची गरज नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Devendra fadnavis talked about ajit pawar having same birthday vsk

ताज्या बातम्या