लोकसत्ता प्रतिनिधी
सोलापूर : भक्तिमय आणि मंगलमय वातावरण, जल्लोष, आनंदाला आलेले उधाण, गल्लीबोळात भगव्या पताका आणि भगवे ध्वज, फटाक्यांची आतषबाजी, प्रमुख रस्त्यांवरून वाजतगाजत निघालेल्या शोभायात्रा, मिठाई वाटप, जय श्रीरामाच्या टोकदार घोषणा असे वातावरण अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेच्या निमित्ताने सोलापुरात पाहायला मिळाले.
गेल्या शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर भेटीनंतर श्रीराममय वातावरणाच्या निर्मितीला खरी सुरूवात झाली होती. भाजपसह संघ परिवारातील संघटनांकडून रसद पुरविण्यापासून ते अन्य प्रोत्साहनातून शहरात भगवेमय आणि राममय वातावरण तयार झाले होते. त्याचा प्रभाव इतका होता की, लग्नसोहळ्यातही श्रीरामाच्या प्रतिमांचे पूजन केले गेले. अनेक मंदिरांमध्ये गेले दोन दिवस भजन, कीर्तनासारखे कार्यक्रम झाले. मंदिरांना मोठ्या प्रमाणावर विद्युत रोषाणाईसह फुलांची सजावट करण्यात आली होती. आज अयोध्येत श्रीरामलल्ला मंदिरात विराजमान होत असताना पहाटेपासून मंदिरांमध्ये रामभक्तीची गीते ध्वनिक्षेपकांवरून वाजविली जात होती. अनेक खासगी इमारगी विद्युत रोषणाईने उजळून निघाल्या होत्या. घराच्या अंगणात सुंदर रांगोळ्या रेखाटून सडासमार्जन करून, दरवाजांवर तेलाचे दिवे प्रज्वलित करण्यात आले होते. काही रामभक्तांनी घरांवर दिवाळीसारखे आकाशदिवे लावले होते. मध्यरात्रीपासून फटाक्यांची आतषबाजी सुरूच होती. दुपारी श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न होत असताना फटाक्यांच्या आतषबाजीसह जय श्रीरामाच्या घोषणांना ऊत आला होता. दुचाकीस्वारांच्या झुंडी गाड्यांचे सायलेंसर काढून घोषणा देत निघाल्या होत्या.
दुपारी आनंदासह भक्तिमय वातावरणात रंग भरला होता. बहुसंख्य रस्ते, बाजारपेठा आणि गल्लीबोळ भगव्या पताकांनी व्यापून गेल्या होत्या. जागोजागी श्रीरामाच्या प्रतिमांचे भक्तिभावाने पूजन करून मिठाई व फळांचे वाटप करण्यात आले. गुजराती समाजाच्या महिलांनी जलकुंभासह श्रीरामाची शोभायात्रा काढली होती. रथयात्रेत राम, लक्ष्मण आणि सीतेची वेशभूषा केलेली मुले विराजमान झाली होती. काही मंडळांनी दिवसभर व्यासपीठ उभारून श्रीरामाच्या पूजनासह ध्वनिक्षेपकांचा मुक्त वापर करीत रामगीते वाजविली.
हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी
माळशिरस तालुक्यात मोरोची येथे लोकवर्गणीतून बांधण्यात आलेल्या मंदिरात राम-सीता-लक्ष्मणासह विठ्ठल-रूक्मिणी, गणपती आदी देवदेवतांच्या मूर्तींची भक्तिभावाने प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. मंदिरावर कळसारोहणही झाले. यावेळी मंदिरावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टीही करण्यात आली. संपूर्ण गाव राममय बनले होते. करमाळा शहरातील वेताळपेठेतही श्रीराम मंदिरात श्रीरामाची मूर्ती विराजमान झाली. बहुसंख्य खेडोपाड्यांमध्ये राममय वातावरण पाहायाला मिळाले. काही गावांमध्ये वारकरी सांप्रदायाशी संबंधित वारकरी मंडळींनी ‘श्रीराम जय राम जय जय रामा’च्या नामाचा गजर करीत दिंड्या काढल्या. टाळ-मृदुंगासह निघालेल्या या दिंड्यांमधून पंढरपूरच्या यात्रेसारखे वातावरण पाहायला मिळाले.