Dhananjay Deshmukh : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबरला अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. या प्रकरणाचे पडसाद अद्यापही उमटत आहेत. यातला आरोपी कृष्णा आंधळे हा फरार आहे. तो सोडून इतर सगळ्यांना अटक करण्यात आली आहे. तर अवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला अटक झाली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं होतं. ज्यामध्ये धनंजय देशमुखही दिसत होते. आता याबाबत धनंजय देशमुख यांनी मोठा खुलासा केला आहे.

मनोज जरांगेंच्या उपोषणाला धनंजय देशमुख यांचा पाठिंबा

मनोज जरांगे यांच्या उपोषणाला धनंजय देशमुख यांनी एक दिवस उपोषण करत पाठिंबा दिला .संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेला ५० दिवस उलटले असून कुटुंबाच्या वेदना अजून कायम असल्याचं ते म्हणाले. पोलीस आपले तपासकाम मार्गी लावत असून तपास यंत्रणेवर त्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. अजूनही कुटुंबाच्या वेदना तेवढ्याच कायम आहेत. आरोपींना अटक होत आहे त्यामुळे तपासात आशेचा किरण आहे. तपास यंत्रणेचे रोज एक एक काम सुरू आहे. तपास ज्या दिवशी पूर्ण होईल त्या दिवशीच मी व्यक्त होईल असंही धनंजय देशमुख म्हणाले. कुटुंब आणि गावाला भीती कायम आहे कारण आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. पण सरकार गंभीर आहे फाशी दिल्याशिवाय थांबणार नाही, असंही धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सीसीटीव्हीबाबत काय म्हणाले धनंजय देशमुख?

संतोष देशमुख हत्या प्रकरणात एकीकडे वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे .कृष्णा आंधळेला वाँटेड घोषित करण्यात आलं आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर दररोज नवनवे पुरावे तपास यंत्रणांना सापडत असून काही दिवसांपूर्वी सापडलेल्या सीसीटीव्हीवर धनंजय देशमुख बोलले आहेत. धनंजय देशमुख म्हणाले, “केजमध्ये एक ठिकाण आहे तिथे सगळेच जण भेटतात. त्याच ठिकाणी मी माझ्या मित्रांसोबत चहापानासाठी बसलो होतो.त्या ठिकाणी आरोपी आणि एपीआय आले. मला त्यांनी बोलवून घेतलं. माझी आणि आरोपीची चर्चा त्या ठिकाणी झाली नाही. चहा पिऊन झाल्यावर त्यांचं बिल मी दिलं. मला कल्पना असती तर मी पोलिसांकडे गेलो असतो. आरोपींनी त्यांचे टार्गेट पूर्ण केले. आपण मात्र चांगुलपणा केला होता. पण आरोपींनी घात केला.माझ्याकडे आलेल्या लोकांसाठी अतिथी देवो भवचा बोर्ड लावला आहे. आपलं काम आहे या भावनेतून मी साहेबांसाठी बिल दिलं. असं धनंजय देशमुख म्हणाले आहेत. एबीपी माझाशी त्यांनी संवाद साधला त्यावेळी हा खुलासा केला आहे.