Anjali Damania on Dhananjay Munde: संतोष देशमुख हत्या प्रकरणी अंजली दमानिया अनेक दिवसांपासून आक्रमकरित्या पाठपुरावा करताना दिसत आहेत. वाल्मिक कराडसह इतर आरोपींच्या विरोधात त्यांनी काही पुरावे समोर आणले होते. हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेला बीड ऐवजी लातूर कारागृहात हलिवण्याच्या निर्णयावरही त्यांनी काल टीका केली होती. अंजली दमानिया यांनी आज राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेऊन त्यांना बीडमधील परिस्थितीची माहिती दिली. यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले.

अंजली दमानिया म्हणाल्या, रश्मी शुक्ला यांना बीडमधील दहशतीची माहिती दिली. तसेच मंत्री धनंजय मुंडे यांच्या कंपन्यांची माहिती दिली. “व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस, टर्टल्स लॉजिस्टिक लिमिटेड या दोन कंपन्यामध्ये धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे आहेत. यात वाल्मिक कराडही भागीदार आहे. या दोन कंपन्यांना महाजेनकोचे कंत्राट कसे मिळाले? ऑफिस ऑफ प्रॉफिट या नियमाप्रमाणे मंत्री किंवा आमदार जर लाभ मिळवत असतील तर ते चुकीचे आहे. लोकप्रतिनिधीला नियमाप्रमाणे लाभाचे पद घेता येत नाही. त्यामुळे त्यांची आमदारकीही रद्द होऊ शकते”, असा दावा अंजली दमानिया यांनी केला.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून धनंजय मुंडे यांच्या कंपन्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणार असल्याचेही त्या म्हणाल्या. जगमित्र शुगर मिल्स कंपनीसाठी ६२ कोटींचे कर्ज यांना कोणत्या निकषावर देण्यात आले? असा सवाल दमानिया यांनी उपस्थित केला. ईडी आणि सीआयडींनी त्यांच्या कंपन्यांची चौकशी केली पाहीजे. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी माझे म्हणणे ऐकून घेतले असून त्यावर उचित कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिल्याचे दमानिया म्हणाल्या.

अंजली दमानिया पुढे म्हणाल्या, “वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी देण्यात आल्याचे कळले. खरेतर त्याची पोलीस कोठडी इतक्या लवकर संपली कशी? असा प्रश्न निर्माण होतो. कारण कालच काही व्हिडीओ समोर आले होते. त्यानंतर याची सखोल चौकशी करण्याची गरज होती. पण तरीही त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली. तसेच विष्णू चाटे या आरोपीलाही त्याच्या मागणीनंतर लातूर कारागृहात ठेवण्याचा पर्याय दिला गेला. हे चुकीचे आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
Anjali Damania
अंजली दमानिया म्हणाल्या, “पोलिसांनी खंडणी प्रकरणात वेळीच पावलं उचलली असती तर संतोष देशमुखांचे प्राण गेले नसते”. (PC : Anjali Damania/X)

संतोष देशमुख प्रकरणात आरोपी आणि पोलिसांचे संबंध आहेत. ते मोडून काढायचे असतील तर त्यांना मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात टाकले जावे, अशी मागणीही अंजली दमानिया यांनी दिली. हे केल्याशिवाय या प्रकरणाची नीट चौकशी होणार नाही.