Dhananjay Munde On Manoj Jarange Patil Murder Conspiracy: मराठा आरक्षणासाठी मोठे आंदोलन उभे करणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत त्यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. त्यांच्या हत्येचा कट माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी रचल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत या आरोपांना उत्तर दिले आहे.
धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले?
मनोज जरांगे यांच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, मंत्री म्हणून मला जेव्हा मनोज जरांगे यांचं उपोषण सोडायला लावलं, त्यावेळी माझ्या हाताने त्यांनी एकदा उपोषण देखील सोडले आहे. तसं माझं आणि त्यांचं वैर नाही. जीवनात कधीच, १७ तारखेची सभा सोडता, मनोज जरांगे यांच्याविरोधात मी एका शब्दानेही बोललेलो नाही. एक आरोपही केला नाही. अशा परिस्थितीत एकीकडे सर्व समाजाला सोबत घेऊन जात असताना, हा व्यक्ती कसाच आता आवरत नाही, म्हणून यालाच पूर्णपणे राजकीय, सामाजिक एवढंच नाही… तर मनोज जरांगेंना वाटतं की धनंजय मुंडे या पृथ्वीतलावरच नसावा, यासाठी ही धडपड आहे, असे धनंजय मुंडे म्हणाले आहेत.
तुम्ही हाकेंना मारलं, मारामारीची प्रवृत्ती कोणाची आहे? तुम्ही वाघमारेंना मारलं… असे किती उदाहरणे देऊ. आता मात्र काही लोक मला भेटले, मी कट केला, मीच याच्या पाठिशी आहे…. इथे परळीची जनता बसली आहे… माझ्याकडून त्यांना धोका? माझा आणि त्यांचा काय बांधाला बाध आहे? माझं आणि त्यांचं वैर काय? माझं आणि त्यांचं वैर एवढंच आहे की तुम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नका. मराठा आरक्षण घ्या, त्या लढाईत आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून लढू, असेही धनंजय मुंडे पुढे बोलताना म्हणाले.
निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी नावं घ्यायची… आता मी गेस्ट हाऊसला दर सोमवारी बसतो, अनेक जण येतात, भेटतात, बोलतात. कोणाला बाजूला जाऊन बोलावं लागतं. आत्ता जे अटक केलेत त्यापैकी कोणी मला भेटलं असेल, बाजूला जाऊन बोललं असेल. मी सामान्य, सरळ माणूस आहे. भेटल्याने आणि बाजूला जाऊन बोलल्याने यात कसला कट रचला जातोय हे मला कळत नाही. अटक झालेले कार्यकर्ते त्यांचेच, बोलणारे कार्यकर्ते त्यांचेच, कबुली जबाब देणारे कार्यकर्ते त्यांचेच आणि आरोप मात्र माझ्यावर करत आहेत. माझी एक मर्डरर म्हणून प्रतिमा तयार करत आहेत. याला कारणं अनेक आहेत, मी एका सभेत उपस्थित केलेल्या दोन प्रश्नांवर त्यांची बोलण्याची तयारी नाही, असे धनंजय मुंडे म्हणाले.
तिघांचीही नार्को टेस्ट करा
मनोज जरांगेंना धमकी आहे, मी त्यांना काही करण्याचा प्रयत्न करतोय असं काही चाललं असेल तर माझी मागणी आहे की या सर्व प्रकरणाची चौकशी महाराष्ट्र शासनाने नाही र सीबीआयनेच केली पाहिजे. माझ्या मनात जरी असं पाप आलं असेल, की कोणाला मारायचं, कोणाला थापड मारायची किंवा आणखी काही करायचं… तर माझी ब्रेन मॅपिंग करा, माझ्या बरोबर जरांगेंचीही करा, जे आरोपी पकडलेत त्यांचीही करा. ब्रेन मॅपिंगसोबत नार्को टेस्ट देखील करा. कोर्टाची अडचण येत असेल तर मी स्वतः वकिल लावून आरोपींची, जरांगेंची आणि माझी कोर्टाकडून परवानगी घेऊन ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट करू, म्हणजे खरं काय ते लक्षात येईल असेल धनंजय मुंडे म्हणाले.
हे फार महागात पडणार
धनंजय मुंडे यांनी यावेळी मनोज जरांगेंना इशारा देखील दिला. ते म्हणाले, आज आर्टिफिशीयल इंटेलिजन्सनी काहीही तयार करता येतं. माझं फोनवर बोलणं झालं असं म्हणतात. माझा एकमेव फोन २४ तास चालू असतो. माझ्या आजूबाजूला गरीब माणसं आहेत. त्यांना कोणतीही अडचण आली की ते मला फोन लावतात. त्यांची अडचण होऊ नये म्हणून मी माझा फोन चालू ठेवतो. त्याच्यात जर मला कोणी फोन केला आणि बोलले, याचा अर्थ त्या अर्थाने बोललो? त्यांना संपवण्यासंबंधी बोललो? या सगळ्या गोष्टी मनोज जरांगेजी फार महागात पडणार आहेत. जेवढं खोटं कराल तेवढं खोटं तुमच्या विरोधात देखील फिरेल हे लक्षात ठेवा.
