Dhananjay Munde Demanded responsibility to Sunil Tatkare : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) आमदार धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड हा बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील प्रमुख आरोपी असून त्याला अटक करण्यात आली आहे. धनंजय मुंडे हे वाल्मिक कराडच्या पाठिशी उभे असल्याने कराडने बीड जिल्ह्यात दहशत माजवल्याची टीका सातत्याने होत आली आहे. कराड आणि त्याच्या टोळीच्या अनेक गुन्हे प्रकरणांमुळे विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्याचदरम्यान आरोग्याचं कारण पुढे करत मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, मुंडे यांना आता पुन्हा एकदा मंत्रिपदाचे वेध लागल्याचं दिसत आहे.

राष्ट्रवादीचे (अजित पवार) प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांचा आज (२२ सप्टेंबर) कर्जत (रायगड) येथे नागरी सत्कार करण्यात आला. या सोहळ्याला धनंजय मुंडे देखील उपस्थित होते. यावेळी भाषण करताना धनंजय मुंडे यांनी त्यांच्या मनातील इच्छा तटकरे यांच्यासमोर व्यक्त केली.

आमदार मुंडे काय म्हणाले?

धनंजय मुंडे म्हणाले, “मला यापूर्वी विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपद मिळालं होतं. खरंतर त्यावेळी सुनील तटकरे हे विरोधी पक्षनेते होणार होते. परंतु, त्यांनी मोठं मन करून ती जबाबदारी माझ्यावर सोपवली. त्यामुळेच आज मी तुमच्यासमोर उभा आहे. माझ्यासारखे असंख्य तरुण उभे आहेत ते फक्त सुनील तटकरे यांच्यामुळेच. आज त्या सुनील तटकरे यांना ‘भारतभूषण’ पुरस्कार देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांचं अभिनंदन करण्यासाठी मी इथे उभा आहे. मी संपूर्ण बीडमधील जनतेच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो. तसेच परळीच्या वैद्यनाथाला प्रार्थना करतो की सुनील तटकरे यांना आमच्यापेक्षाही चांगलं आरोग्य मिळावं. आम्ही थकलो तरी आम्हाला हात देऊन उठवू शकतील इतकं चांगलं आरोग्य त्यांना मिळावं यासाठी प्रार्थना करतो.

धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचे वेध?

“माझी सुनील तटकरे यांना विनंती आहे की त्यांनी कायम आम्हाला मार्गदर्शन करत राहावं. आम्ही चुकलो तर आमचे कान धरावे. चुकलो नाही तर चांगलंच आहे. पण आता रिकामं ठेवू नका. जबाबदाऱ्या द्या एवढीच मी त्यांना विनंती करतो.”

तटकरेंकडून कायम वडीलकीची साथ मिळाली : मुंडे

आमदार मुंडे म्हणाले, “माझ्या राजकीय व सामाजिक जडणघडणीत तटकरे यांची वडिलकीची साथ व भक्कम पाठबळ मला लाभलं आहे. देशाच्या संसदेत काम करताना देशहिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन तटकरे यांनी आजवर काम केले, त्याच हिरीरीने आणि विश्वासाने पक्षात देखील नवतरुण चेहऱ्यांना संधी देत पक्षाला देखील एका उंचीवर नेण्याचं काम त्यांनी केलं आहे. सर्वांना हवेहवेसे वाटणारं हे नेतृत्व उत्तरोत्तर प्रगती करत जावो, त्यांचं मार्गदर्शन आम्हाला सदैव मिळत राहो व त्यांना उत्तम आयुरारोग्य लाभो.”