Dhananjay Munde Demands Banjara Reservation in ST : माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) आमदार धनंजय मुंडे यांनी सोमवारी (१५ सप्टेंबर) बीड शहरात बंजारा समाजाच्या वतीने आयोजित विराट मोर्चाला हजेरी लावली. या मोर्चाच्या माध्यमातून त्यांनी मराठवाड्यातील बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटमधील नोंदीनुसार अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी केली. या मागणीसाठी राज्य सरकारने स्वतंत्र विशेषाधिकार समिती स्थापन करावी, अशी आग्रही मागणी देखील केली.
दरम्यान, धनंजय मुंडे यांनी संविधानाच्या चौकटीत राहून यासाठी मोठ्या स्वरूपात लढा उभा करण्यात येणार असून हा लढा यशस्वी होईपर्यंत मी या लढ्यात बंजारा समाजाबरोबर उभा असेन असा शब्द देखील दिला. यावेळी केलेल्या भाषणात मुंडे यांनी बंजारा आणि वंजारी एकच आहेत असं वक्तव्य केलं. या वक्तव्यामुळे राज्याचं राजकारण तापलं आहे. त्यांच्या वक्तव्यावर अनेकांनी आक्षेप नोंदवला आहे. तसेच बंजारा समाजातील तरुणांनी देखील धनंजय मुंडे यांनी आपलं वक्तव्य मागे घेण्याची मागणी केली आहे.
“बंजारा व वंजारी वेगळे आहेत का?” धनंजय मुंडेंचा सवाल
धनंजय मुंडे आपल्या भाषणात म्हणाले, “बंजारा समाजाला तेलंगणात एसटी (अनुसूचित जमाती) प्रवर्गात आरक्षण दिलं आहे. राजस्थानातही एसटी प्रवर्गात आरक्षण देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे आम्हीसुद्धा राजस्थानात एसटीच आहोत. त्यामुळे बंजारा-वंजारी वेगळे आहेत का?”
बंजारा समाजा धनंजय मुंडेंविरोधात आक्रमक
धनंजय मुंडेंच्या वक्तव्याविरोधात बंजारा समाज आक्रमक झाला आहे. मुंडे यांच्या वक्तव्यावर बंजारा समाजातील काही प्रतिनिधींनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी धनंजय मुंडे यांना आवाहन केलं आहे की त्यांनी त्यांचे शब्द मागे घ्यावेत. वंजारी व बंजारा हे वेगळे समाज असून त्यांची भाषा आणि संस्कृती वेगळी आहे.
“आरक्षणाच्या मुद्द्याला धनंजय मुंडे यांनी वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करू नये”
बंजारा समाजातील काही तरुणांनी टीव्ही मराठीशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, “बंजारा व वंजारी हे समाज वेगवेगळ्या प्रवर्गात मोडतात. दोघांची राहण्याची पद्धत, वेशभूषा आणि खाद्यसंस्कृती वेगवेगळी आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्याला धनंजय मुंडे यांनी वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करू नये. तसेच त्यांनी केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण द्यावं आणि बंजारा समाजाची माफी मागावी. दोन्ही जाती वेगवेगळ्या आहेत. आरक्षणात एकत्र करता येणार नाहीत.